Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधीकडे घरही नाही, कारसुद्धा नाही… संपत्ती आहे तरी किती?
Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एमफील पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी रोलिन्स कॉलेज फ्लोरिडा येथून आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. राहुल गांधी यांच्यावर देशभरातील अनेक राज्यांमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत.
कॉग्रेस नेता राहुल गांधी यांनी शुक्रवार उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनिया गांधी यांच्या असलेल्या या मतदार संघातून राहुल गांधी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी संपत्ती आणि गुन्हेगारीसंदर्भातील प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे 20 कोटीपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे. त्यात 4.2 लाख रुपयांचे सोने आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असतानाही राहुल गांधी यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नाही आणि कारसुद्ध नाही.
अशी आहे संपत्ती
राहुल गांधी यांनी 9 कोटी 24 लाख 59 हजार 264 रुपयांची चल संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यात 4 कोटी 33 लाख 60 हजार 519 रुपये शेअरमध्ये गुंतवले आहे. तसेच 3 कोटी 81 लाख 33 हजार 572 रुपये म्यूचुअल फंडात टाकले आहे. त्यांच्याकडे 26 लाख 25 हजार 157 रुपयांचा बँक बॅलन्स आणि 15 लाख 21 हजार 740 रुपयांचे गोल्ड बॉन्ड आहे.
अचल संपत्ती अशी
राहुल गांधी यांच्याकडे 11 कोटी 15 लाख 2 हजार 598 रुपये अचल संपत्ती आहे. त्यात 9 कोटी 4 लाख 89 हजार रुपयांची संपत्ती स्वत: विकत घेतली आहे. तर 2 कोटी 10 लाख 13 हजार 598 रुपयांची संपत्ती वारस परंपरेने मिळाली आहे.
शेत जमिनीत बहिणाचा वाटा
राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे 55 हजार रुपये रोख असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोने आणि 4.2 कोटी रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे कोणतीही कार किंवा अन्य प्रकारचे वाहन नाही आणि घरही नाही, परंतु त्यांच्यावर 49 लाख 79 हजार 184 रुपयांचे कर्ज आहे, असा दावा त्यांनी केला. स्थावर मालमत्ता म्हणून, त्यांच्याकडे सुलतानपूर, मेहरौली, दिल्ली या गावात सुमारे 3.778 एकर शेतजमीन आहे, ज्यामध्ये त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा यांचाही वाटा आहे.
राहुल गांधी यांना असे मिळते उत्तन्न
खासदार म्हणून पगार, रॉयल्टी, भाडे, रोख्यांचे व्याज आणि म्युच्युअल फंडातील नफा हे राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. त्यांनी 2022-23 आणि 2021-22 या आर्थिक वर्षातील त्यांचे एकूण उत्पन्न देखील उघड केले. 2022-23 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 2 लाख 78 हजार 680 रुपये घोषित करण्यात आले आहे, तर 2021-22 मध्ये त्यांचे उत्पन्न 1 कोटी 31 लाख 4 हजार 970 रुपये होते.
केंब्रिज विद्यापीठातून पदवी
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एमफील पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी रोलिन्स कॉलेज फ्लोरिडा येथून आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. राहुल गांधी यांच्यावर देशभरातील अनेक राज्यांमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत.