Lok Sabha Elections 2024: महिला मतदार बजावणार यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरु केली आहे. यंदा अनेक नवीन मतदार देखील जोडले गेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे जाणून घ्या कसे.
Loksabha election 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे सात कोटी अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. याआधीच्या निवडणुकीत ही पुरुषांपेक्षा महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक असल्याचं दिसून आले आहे. यंदाच्या नव्या ७ कोटी मतदारांमध्ये तीन कोटी पुरुष तर चार कोटी महिला मतदार आहेत.
सार्वत्रिक निवडणूक २०२४ ला सुमारे ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४९.५ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला आणि ४८ हजारांहून अधिक तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यंदाच्या मतदानाच्या यादीतून निवडणूक आयोगाने मयत झालेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या मतदार यादीतून सुमारे १.६५ कोटी मतदारांची नावे काढून टाकली आहेत.
महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केलीये. ज्यामध्ये यावेळी २.६३ कोटी नवीन तरुण मतदारांचा समावेश झाला आहे. त्यातही महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा सुमारे १५ टक्के अधिक आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदार यादीत समाविष्ट 18 ते 29 वयोगटातील नवीन तरुण मतदारांमध्ये १.४१ कोटी महिला आणि १.२२ कोटी पुरुष मतदारांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये दर एक हजार पुरुषांच्या मागे महिलांचा दर ९२८ होते. आता मात्र हा दर ९४८ झाला आहे. यंदा होत असलेल्या निवडणुकीत १०.६४ लाखांहून अधिक मतदारांची भर पडली आहे. यामध्ये १ एप्रिल, १ जुलै किंवा १ ऑक्टोबर रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा समावेश आहे.
२२ लाखांहून अधिक बनावट मतदार
निवडणूक आयोगाने दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असलेल्या २२ लाखांहून अधिक मतदारांची ओळख पटवली आहे. दोन नावे असलेल्या लोकांचे एका यादीतून नाव कमी करण्यात आले आहे. दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी मोहीम देखील राबवली जात आहे. १.६५ कोटी मतदारांपैकी ६७.८२ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ७५.११ लाख मतदार असे होते जे त्या ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले किंवा त्यांच्या पत्त्यावर सापडले नाहीत.