Lok Sabha Election: लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार, किती टप्प्यांमध्ये होणार मतदान, महत्वाचे अपडेट
Lok Sabha Elections 2024 Schedule: निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर दौरा करणार आहे. हे दौरे १२ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १३ मार्चपासून कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते.
नवी दिल्ली, दि. 24 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून नियोजन केले जात आहे. राजकीय पक्षही निवडणूक तारखांच्या घोषणांची वाट पाहत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी विविध राज्यांचे दौरे करत आहेत. हे दौरे १२ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १३ मार्चनंतर कधीही लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक सात ते आठ टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर दौरा करणार आहे. हे दौरे १२ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १३ मार्चपासून कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोग गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली गेली आहे. बैठकांचे सत्र सुरु आहे. ईव्हीएम, सुरक्षा व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आढावा घेतला जात आहे.
सात टप्प्पात निवडणूक
2024 ची लोकसभा निवडणूक 2019 प्रमाणे असण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. तसेच पहिल्या टप्याचे मतदान 11 एप्रिल रोजी झाले होते. जवळपास अशाच तारखा यावर्षी असणार आहेत. 2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यात 6 मे, त्यानंतर 12 आणि 19 मे रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले होते. मतमोजणी 23 मे रोजी झाली होती.
निवडणूक आयोगाची तयारी सुरु असताना राजकीय पक्ष कामाला लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप २७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले आहे. महायुतीमधील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर राज्यातही प्रचाराचा धुराळा उडणार आहे.