अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर… निवडणूक आयुक्तांची शेरोशायरी; विरोधकांवर पलटवार ?
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर 1 जून रोजी सातव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्यावेळीच निकाल जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली. यावेळी त्यांनी शेरोशायरीही सादर करत विरोधकांवर पलटवार केला.

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : आज लागेल, उद्या लागेल म्हणून ज्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, त्याबाबतची आज मोठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. म्हणजे एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होणार असून जूनमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. म्हणजे आजपासून जूनपर्यंत निवडणुका चालणार आहेत. हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयुक्तांनी जोरदार शेरोशायरी केली. त्यातून त्यांनी विरोधकांवर पलटवारही केला.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी लागणारं मनुष्यबळ, ईव्हीएम मशीनचा पुरवठा आणि पोलिंग बूथ याबाबतची माहिती दिली. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती देतानाच निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी इशारेही दिले. यावेळी राजीव कुमार यांना ईव्हीएम मशीनबाबतच्या विरोधकांच्या आरोपांवर विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी थेट शेरोशायरीतून उत्तर दिलं.
रात्रीच लिहिलीय…




अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठिक नही, वफा खुद से नहीं होती, खता ईव्हीएम की कहते हो, बाद में गोया जब परिणाम आता है, तो उस पर कायम भी नही रहते हो… असं उत्तर राजीव कुमार यांनी दिलं. ही शायरी साद केल्यानंतर रात्रीच हा शेर लिहिलाय. पण हे मी म्हणत नाही. ईव्हीएम म्हणत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो…
यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना आवाहन केलं. राजकीय पक्षांनी डेकोरम मेंटेन ठेवावा. आपल्या भाषणात वैयक्तिक टीका करू नका. द्वेष पसरवणारं भाषण करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी बद्र साहेबांचा एक शेर म्हटला. दुश्मनी जमकर करो, लेकीन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो.. राजीव कुमार यांनी हा शेर म्हणताच एकच हशा पिकला. हा शेर म्हटल्यावर त्यांनी एक मार्मिक टिप्पणीही केली. लवकरात लवकर मित्र आणि दुश्मन बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं त्यांनी म्हटलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी तर हा शेर नव्हता ना असं मनात आल्याने पत्रकारांनाही आपलं हसू रोखता आलं नाही.
तो क्या मिल जाएगा धोखे के सिवा…
दोन शेर म्हटल्यानंतर थांबतील ते निवडणूक आयुक्त कसले? त्यानंतरही त्यांनी आणखी एक शेर सादर केला. जणू काही मैफिलच जमली की काय असा भास व्हावा असा माहौल तयार झाला होता. झूठ के बाजार में रौनक बहुत है, पकड भी लोगो तो क्या मिल जाएगा धोखे के सिवा… हा शेर सादर केल्यावर त्यांनी फेक न्यूजवरून इशारे दिले. निवडणूक काळात फेक न्यूज देऊ नका. फेक न्यूज दिल्यास गंभीर कारवाई करू. या बातम्यांची सत्यता पडताळली जाईल. त्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.