Loksabha election : भाजपची 200 उमेदवारांची यादी तयार, या दिवशी होणार जाहीर
BJP candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर ग्रुपची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत २०० हून अधिक जागांवर विचारमंथन करण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीत २०० उमेदवारांची यादी जवळपास तयारी झाली असून लवकरच ती जाहीर होऊ शकते.
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. अब की बार ४०० पार चा नारा त्यांनी दिलाय. विरोधकांवर हल्लाबोल करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीयेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
तीन – चार दिवसांत यादी जाहीर होणार
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, भाजपची निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे. भाजपच्या सुमारे 200 उमेदवारांची यादी तयार आहे. तीन ते चार दिवसांत सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे निश्चित आहे आणि त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. असं देखील त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली नुकतीच भाजप सीईसीची बैठक पार पडली. गुरुवारी रात्री 10.45 वाजता सुरू झालेली बैठक शुक्रवारी पहाटे 3.15 वाजता संपली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय भाजप संघटन सरचिटणीस बी.एल. देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या सीईसी बैठकीत उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तराखंड, गोवा, झारखंड, दिल्ली, त्रिपुरा, हरियाणा आणि 150 हून अधिक लोकसभा जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी विचारमंथन झाले.
पंतप्रधानांचे 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य
पंतप्रधान मोदींनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीसाठी 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जनतेला भाजपला 370 पेक्षा जास्त जागा जिंकून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. याशिवाय काही आमदारांंना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला ४०० जागा जिंकता याव्यात यासाठी भाजपने अनेक मित्रपक्षांना सोबत घेतले आहे.