प्रेम, पैसा आणि ब्लॅकमेलिंग, कशामुळे झाली महालक्ष्मीची हत्या?
कर्नाटकातील महालक्ष्मी नावाच्या महिलेच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याच्या प्रकरणात रोज नवे वळण येत आहे. महालक्ष्मीचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणण्यात आले होते. पण गुन्हा केल्यानंतर आरोपीने फाशी घेत आत्महत्या केली आहे.
21 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटकातील बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. घराचे दार उघडताच शेजाऱ्यांच्या हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाटत होते. लोकांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. बंद फ्लॅटमध्ये 29 वर्षीय महालक्ष्मीचा तुकडे फ्रिजमध्ये भरलेले होते. फ्लॅटमध्ये सगळीकडे रक्त दिसत होते. मृतदेहाचे तुकडे कुजल्याने खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे लोकांनी लगेचच पोलिसांना फोन करुन बोलवलं. मृतदेहाचे जवळपास ६० तुकडे करण्यात आले होते. महालक्ष्मी पती आणि कुटुंबापासून दूर येथे एकटीच राहत होती. आजुबाजुचे इतके घाबरले होते की, महालक्ष्मीची अशी अवस्था कोणी केली हे कोणालाच कळत नव्हते.
महालक्ष्मीची हत्या झाल्याचे निष्पन्न
मृतदेहाचे तुकडे गोळा केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात 2 ते 3 सप्टेंबर दरम्यान महालक्ष्मीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. महालक्ष्मीचा मोबाईल 2 सप्टेंबरपासून बंद होता. पतीसोबत आधीच भांडण सुरू होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. कुटुंबात तिच्या भावासोबत मतभेद झाल्यानंतर ती त्यांच्यापासून दूर राहायला गेली. तिने ती खोली भाड्याने घेतली होती. पण ती आईच्या संपर्कात होती.
महालक्ष्मीचा खून करणारा मुक्ती रंजन रॉय असल्याचा संशल पोलिसांना होता. मुक्ती रंजन रॉय हा ओडिशाचा रहिवासी असल्याने कर्नाटक पोलिसांनी अनेक पथकं त्याला पकडण्यासाठी ओडिसाला पाठवले होते. ज्या मॉलमध्ये महालक्ष्मी काम करत होती त्याच मॉलमध्ये तो तिचा बॉस होता. दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रेम संबंध होते. पोलीस पकडायला येण्याआधीच मुक्ती रंजन याने ओडिशातील त्याच्या गावी जाऊन आत्महत्या केली. त्याने एका डायरीत सुसाईड नोट देखील लिहिली होती.
दुसऱ्या पुरुषासोबत संबंध
प्रेम, पैसा आणि हत्या अशी या या गुन्ह्यामागची कथा. मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजनने सांगितले की, महालक्ष्मी आपल्या भावाला ब्लॅकमेल करायची. ब्लॅकमेलिंगची ही गोष्ट खुद्द मुक्ती रंजन याने सत्यरंजन याला सांगितली होती. तीन पानी सुसाईड नोटमध्ये आरोपीने पैशासाठी आपले शोषण होत असल्याचे आणि महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचे लिहिले आहे.