रांची : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
ही मंगेश पाडगावकर यांची कविता. परंतु या प्रेमासंदर्भात एक वेगळीच सत्यकथा समोर आली आहे. दोन विवाहित महिला, पण दोन्ही महिलांचे नाव एकच. त्यातील एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या नवऱ्यास प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. अन् दोघ विवाहितांनी आपल्या आधीच्या पत्नी व पतीला सोडून लग्न केले. मग त्यानंतर दोन्ही एकटे असणारे पती-पत्नी एकत्र आले. त्यांचे प्रेम फुलू लागले. मग त्यांनीही विवाह केला. आता या दोन्ही जोडप्याच्या मुलांचे काय झाले?
बिहारमधील खगरियामधील हे संपूर्ण प्रकरण दोन कुटुंबांशी संबंधित आहे. चौथम पोलीस स्टेशन हद्दीतील हरदिया गावातील नीरज कुमार सिंह यांचा विवाह पसराहा गावातील रुबी देवीसोबत 2009 मध्ये झाला होता. नीरजलाही 4 मुले झाली. दरम्यान, लग्नानंतर नीरजची पत्नी रुबीदेवी तिचे मूळ गाव पसरा येथील मुकेश कुमार सिंग याच्या प्रेमात पडली. मुकेशचेही लग्न झाले होते. योगायोगाने मुकेशच्या पत्नीचे नावही रुबी देवी आहे.
दोघे पळून गेले
गेल्या वर्षी म्हणजेच 6 फेब्रुवारी 2022 रोजी नीरजची पत्नी रुबी देवी तिचा प्रियकर मुकेश कुमार सिंहसोबत पळून गेली. रुबी देवीने दोन मुले आणि एका मुलीलाही सोबत घेतले. त्यांनी लग्न केले. आता नीरज सिंग एकटा होता. त्याच्यासोबत एक मुलगी राहिली होती. दुसरीकडे मुकेशची पत्नी रुबी देवीही एकटीच राहू लागली.
मग त्यांनी काय केले
नीरजने मग मुकेशची पहिली पत्नी असलेल्या रुबी देवीचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर नीरज कुमार सिंग आणि रुबी देवी बोलू लागले, भेटू लागले. दोघांमध्येही प्रेम फुलले. मग काय? जवळपास वर्षभराच्या आत 11 फेब्रुवारी २०२२ रोजी नीरज आणि रुबीदेवी घरातून पळून गेले.
18 फेब्रुवारीला दोघांनी कोर्टात लग्न केले. नीरजनेही मुकेशची दोन्ही मुले दत्तक घेतली. हे दोन्ही जोडपे मुलांसह मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका जोडप्याने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओही जारी केला आहे. दोन्ही नवऱ्यांनी महिलांसोबत आलेल्या मुलांनाही दत्तक घेतले आहे. या प्रकारची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.