रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले, रेल्वेला द्यावे लागणार एक लाख रुपये
Indian Railways: दिल्ली येथील जया कुमारी यांनी दिल्ली ते इंदूर दरम्यान जानेवारी 2016 मध्ये रेल्वेने प्रवास केला. त्यासाठी मालवा एक्स्प्रेसचे तिकीट त्यांनी बुक केले होते. त्यांनी एक्स्प्रेसमधील आपल्या बर्थच्या खाली सामान ठेवले होते. परंतु त्या डब्यात आरक्षण नसणारे अनेक लोक बसले होते.
भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. अनेक जण आरक्षण काढून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. परंतु आरक्षित डब्यांची परिस्थिती आता जनरल डब्यासारखी होऊ लागली आहे. यामुळे रेल्वे प्रवास करताना सामानाची सुरक्षितता राहिली नाही. नवी दिल्ली ते इंदूर प्रवास करताना आरक्षण कोचमधून एका प्रवासाच्या सामानाची चोरी झाली. रेल्वेने भरपाई करण्यास नकार दिला. मग त्या ग्राहक मंचात गेल्या. आता ग्राहक मंचाने रेल्वेला एक लाख आठ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
दिल्ली येथील जया कुमारी यांनी दिल्ली ते इंदूर दरम्यान जानेवारी 2016 मध्ये रेल्वेने प्रवास केला. त्यासाठी मालवा एक्स्प्रेसचे तिकीट त्यांनी बुक केले होते. त्यांनी एक्स्प्रेसमधील आपल्या बर्थच्या खाली सामान ठेवले होते. परंतु त्या डब्यात आरक्षण नसणारे अनेक लोक बसले होते. त्यावेळी झासी ते ग्वालियर दरम्यान त्यांच्या सामानाची चोरी झाली. त्याची माहिती त्यांनी टीटीई आणि रेल्वे प्रशासनला दिली. परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही.
ग्राहक मंचात तक्रार दाखल
दिल्लीला परत आल्यानंतर जया कुमारी यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. त्यांनी रेल्वेच्या सेवेतील निष्काळजीपणा आणि कमतरता दाखवली आहे. सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे तसेच प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करणे हे रेल्वेचे कर्तव्य होते, परंतु रेल्वेकडून त्याचे पालन झाले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. रेल्वेने प्रवाशाने आपल्या सामानाकडे लक्ष दिले नाही. तसेच ते सामान बुक केले नव्हते, असा दावा केला.
आयोगाने दिले आदेश
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ग्राहक मंचाने आपला निकाल दिला. त्यात म्हटले आहे की, रेल्वेत सामान हरवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी जया कुमारी यांना भटकंती करावी लागली. तपासासाठी अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नाही. रेल्वेतून प्रवास करताना सामानाचे मूल्य किती आहे? त्याचे कोणतेही पुरावे तक्रारदाराकडे नाही. यामुळे तक्रारदारास त्याच्या सामानाच्या नुकसानीसाठी 80,000 रुपये देण्याचे आदेश रेल्वेला दिले. तसेच त्याची झालेली गैरसोय, त्यांना झालेला मानसिक त्रास यासाठी 20,000 रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी 8,000 रुपये देण्याचे आदेश दिले.