‘निवडणुकीपर्यंत घर सोड’, पतीच्या आदेशामुळे काँग्रेस आमदार धर्मसंकटात, नवरा की पक्ष?
मध्यप्रदेशच्या बालाघाट-सिवनी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप, बसपा आणि इतर अपक्ष असे मिळून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. या मतदारसंघात काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे या चांगल्याच धर्मसंकटात सापडल्या आहेत. कारण त्यांचे पती हे बसपा पक्षातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक होईपर्यंत आपल्या पत्नीला घर सोडण्याचं आवाहन केलं आहे.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडतोय. प्रचारसभा, रोड शो, आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. असं असताना हा राजकीय संघर्ष बालाघाटमधील एका काँग्रेस आमदाराच्या घरापर्यंत पोहोचला आहे. हा वाद घरापर्यंत पोहोचण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. बालाघाटच्या काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे यांचे पती कंकर मुंजारे हे बसपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे कंकर मुंजारे यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्या पत्नीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पत्नीचा पक्ष आणि आपल्या पक्षाची विचारधारा यात भिन्नता आहे. त्यामुळे कंकर मुंजारे यांनी आपल्या पत्नीला घरापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पत्नीने ऐकलं नाही तर आपण स्वत: घर सोडू, असं कंकर मुंजारे म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे या धर्मसंकटात सापडल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांच्या वक्तव्यानंतर या दोन्ही पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. जीतू पटवारी यांनी शक्ति प्रदर्शनवेळी केलेलं वक्तव्य कंकर मुंजारे यांना जिव्हारी लागलं आहे.
बालाघाटमध्ये सुरु असलेल्या वाकयुद्धामुळे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार कंकर मुंजारे आक्रमक झाले आहेत. त्यामागील कारणही तसं आहे. काँग्रेसचे उमेदवार सम्राट सरस्वार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी भर मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी तिथे उपस्थित काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे यांचं नाव घेत म्हटलं, वैनी आपले पती बसपा उमेदवार कंकर मुंजारे यांना निवडणुकीत हरवायचं आहे. जीतू पटवारी यांचं हे वक्तव्य कंकर मुंजारे यांना जिव्हारी लागलं आहे. ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
कंकर मुंजारे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस भाजप सोडून माझ्या पराभवाच्या मागे लागली आहे. यावेळी त्यांनी राजकीय सिद्धांताचा उल्लेख करत आपल्या पत्नीला घर सोडण्याचं आवाहन कंकर यांनी केलं. तसेच पत्नीने घर सोडलं नाही तर आपण स्वत: घर सोडून निवडणूक लढणार असल्याचं कंकर मुंजारे म्हणाले.
पतीच्या आवाहनानंतर अनुभा मुंजारे काय म्हणाल्या?
पतीच्या या आवाहनानंतर आमदार अनुभा मुंजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझं घर आणि राजकीय जबाबदारी चांगल्याप्रकारे हाताळेन”, असं अनुभा मुंजारे म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे याआधीसुद्धा विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकाच घरात राहून वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांसोबत निवडणूक लढवली होती. “आम्ही गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहिलो होतो. तेव्ही मी बालाघाटमधून काँग्रेस उमेदवार होती. तर ते परवाडा येथून गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार होते. मला आता समजत नाही की, ते आता वेगळं राहण्याचा विचार का करत आहेत”, असं अनुभा मुंजारे म्हणाल्या.
कंकर मुंजारे 45 वर्षांपासून राजकारणात सक्रिय
माजी खासदार कंकर मुंजारे हे गेल्या 45 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. तर अनुभा मुंजारे या गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मुंजारे दाम्पत्याने क्रांतिकारी पक्ष, समाजवादी, बीएसपी या पक्षांमध्ये एकत्र काम केलंय. पण 2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अनुभा मुंजारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत बालाघाट येथून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.