छतरपूर : कुणाच्या डोक्यात कोणता राग जाईल याची काही शाश्वती नसते. अगदी क्षुल्लक कारणावरूनही राईचा पर्वत केला जाऊ शकतो. मग तो एखादा सामान्य माणूस असो, एखादा साधा कर्मचारी असो की एखादा उच्चपदस्थ अधिकारी असो. कुणीही यााला अपवाद नाही. राग ही गोष्टच तशी आहे. कुणाच्या कशामुळे भावना दुखावतील हे सांगणं कठिणच. मध्यप्रदेशातील छतरपूर येथेही अशीच एक घटना घडलीय. केवळ दुखावली गेल्याने एका डेप्युटी कलेक्टरने थेट पदाचाच राजीनामा दिला आहे. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
निशा बांगरे असं या उपजिल्हाधिकारीचं नाव आहे. त्यांनी केवळ क्षुल्लक कारणावरून थेट नोकरीच सोडली आहे. सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून तिने नोकरीचा राजीनामा दिला आहे. हे पत्र व्हायरल होत आहे. या पत्रातून तिने धार्मिक भावनेला ठेच पोहोचल्याचं म्हटलं आहे. बांगरे यांनी घर घेतलं होतं. त्यामुळे तिने गृहप्रवेशाचं आयोजन केलं होतं. मात्र, त्यासाठी त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. आपल्याच घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुट्टी मिळत नसल्याने बांगरे नाराज झाल्या. अस्वस्थ झाल्या. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी थेट नोकरीचाच राजीनामा दिला आहे.
त्यांना सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून मनातील वेदना बोलून दाखवली आहे. तसेच विभागावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही केला आहे. मला माझ्याच घराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे मी दु:खी झाली आहे. या कार्यक्रमात तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि ठेवण्यात आल्या होत्या. त्या अस्थिंचंही मला दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे धार्मिक, आस्था आणि संवैधानिक अधिकाराशी तडजोड करून मी डेप्युटी जिल्हाधिकारी पदावर राहू शकत नाही. तसं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी 22 जून 2023 ला तात्काळ प्रभावाने पदाचा राजीनामा देत आहे, असं बांगरे यांनी म्हटलं आहे.
उपजिल्हाधिकारी निशा बांगरे या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरमध्ये एसडीएम पदावर कार्यरत होत्या. घरगुती कार्यासाठी त्यांना सुट्टी मिळाली नव्हती. त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. त्या अस्वस्थेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत निशा बांगरे बैतूलमधील आमला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी मीडियाशी चर्चा करताना तसं सुतोवाचही केलं होतं.
निशा बांगरे यांनी विदिशातील सम्राट अशोक प्राद्योगिक संस्थेतून 2010-2014मध्ये इंजिनीअरींग केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी सुरू केली. त्यानंतर 2016मध्ये त्या एमपीपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण जाल्या. त्यानंतर त्यांची डेप्युटी एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2017मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्या राज्यातील विविध भागात आपली सेवा देत आहेत.