चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान; अयोध्येत पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार आणि आमदार असतील. एकनाथ शिंदे दोन दिवस अयोध्येत राहणार आहेत.
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते राम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आधीपासूनच अयोध्येत दाखल झाले असून ते या दौऱ्याची वातावरण निर्मिती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच अयोध्येत एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लागले आहेत. चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान… असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. ठिकठिकाणी शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे.
अयोध्येतील हनुमान गढी, राम मंदिर परिसरासह ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या स्वागतचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान, असं लिहिलं आहे. या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामाचे फोटो आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे फोटो आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही भला मोठा फोटो आहे. या पोस्टर्ससह अयोध्येत शिवसेनेचे झेंडेही लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.
उद्या अयोध्येत
एकनाथ शिंदे उद्या 8 एप्रिल रोजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत. ते उद्या लखनऊमध्ये उतरतील. शिंदे यांच्या सोबत सुमारे 3 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर 9 तारखेला रविवारी अयोध्येत दाखल होतील. लखनऊ विमानतळ ते अयोध्या हे अंतर 150 किलोमीटर आहे. शिंदे हे रोडनेच अयोध्याला जाणार आहेत. यावेळी त्यांच्या ताफ्यात 100हून अधिक मोटार सायकल असतील. बाईक रॅलीनेच ते अयोध्येत दाखल होणार आहेत. तिथे ते पूजापाठ करणार आहेत. शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
असा असेल दौरा
8 एप्रिल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनऊला पोहोचतील. आमदार, खासदारांसह ते लखनऊच्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील
9 एप्रिल
लखनऊमधील मुक्कामानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल होतील
दुपारी 12 वाजता श्रीरामाची महाआरती करतील
दुपारी 12.20 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिराच्या कामाची पाहणी करतील
दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद घेतील
दुपारी 3 अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्याला भेट देतील
संध्याकाळी 6 वाजता शरयू नदीवर महाआरती
रात्री 9 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील