नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांना याप्रकरणी अहमदाबाद हायकोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे सुरत सेशन्स कोर्ट, सूरत डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनीदेखील ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. अहमदाबाद हायकोर्टाच्या या निकालाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सुनवाणी सुरु होती. अखेर या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावरील शिक्षेला सुप्रीम हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच यापुढे जपून वक्तव्य करण्याचा आदेश कोर्टाने राहुल गांधी यांना दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आनंद व्यक्त केला.
“आज नाही तर उद्या सत्याचाच विजय होणार. काहीही होऊद्या, पण माझा रस्ता ठरलेला आहे. त्याबाबत माझ्या मनात पक्क आहे. ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि जनतेने जे प्रेम आणि पाठिंबा दिला त्यासाठी मी धन्यवाद मानतो”, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दिली.
“राहुल गांधी 4 हजार किमी पेक्षाजास्त अंतर चालत गरिबांना भेटले. ते लहान मुलांना, डॉक्टर, इंजिनिअर सर्वांना भेटले. या सर्वांचा आशीर्वाद आणि सदिच्छा आमच्यासोबत आहेत, असं मी मानतो. त्यामुळेच हा लोकांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. राहुल गांधी यांना अपात्र करण्यात आलं. त्यांना फक्त 24 तासात अपात्र केलं. आता बघुया ते पुन्हा त्यांना किती वेळात त्यांच्या पदावर घेतात”, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
“दिल्लीत असलेलं सुप्रीम कोर्ट आणि संसद यांच्यात काही किमीचं अंतर आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत त्यांच्यावरील अपात्रेवरील कारवाई मागे घ्यावी, अशी आशा आहे. आता ते कारवाई मागे कधी घेतात ते आम्ही पाहू. हा मोदी सरकारला चपराक आहे. आम्ही काय चूक केली, असं करायला नको होतं, असं वाटत असेल. ते मनात म्हणत असतील पण कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही. मला याविषयी जास्त टिप्पणी करायची नाही. ही लोकांचा विजय आहे. वायनाडच्या नागरिकांचा विजय आहे. तिथले नागरीकही खूप खूश आहेत”, असंही खर्गे म्हणाले.