कोलकाता | 24 जानेवारी 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. एका भीषण अपघातातून त्या बचावल्या आहेत. बर्दवान येथून येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बर्दवानहून परत येताना ममता बॅनर्जी आज संध्याकाळी राजभवनात गेल्या आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. तिथेच त्यांनी या अपघाताची माहिती दिली. या अपघातात जीवही गेला असता असं त्या म्हणाल्या. 200 किमी ताशी वेगाने आलेली एक कार त्यांच्या ताफ्यात घुसली. त्यामुळे ड्रायव्हरला एमर्जन्सी ब्रेक मारावा लागला. आताही माझं डोकं गरगरतंय, डोकं दुखत आहे. तापासारखं वाटतंय, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांशी झालेली भेट फलदायी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून राज्यपालांशी चर्चा झाली. येत्या 26 जानेवारी रोजी पुन्हा राजभवनात जाणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला एक पट्टी बांधलेली होती. कार अचानक माझ्या ताफ्यात आली. ही कार ताशी 200 किलोमीटर वेगाने आली होती. ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे डॅशबोर्डला माझं डोकं आपटलं आणि डोक्याला मार लागला. मार अत्यंत जबरदस्त होता. त्यामुळे माझं अजूनही डोकं गरगरतंय आणि डोकेदुखीही वाढली आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
माझं डोकं गरगरत आहे. तरीही मी काम केलं. माझं अंगभरूनही आलं आहे. अंगात कणकणी आहे. आता मी घरी जात आहे, असं त्या म्हणाल्या. माझ्या कारची खिडकी उघडी होती. जर काच बंद असता तर मी मेलेच असते. काच तुटून माझ्या अंगावर आली असती. त्यामुळे मी जखमी झाले असते. असं असलं तरी मी आता घरी जातेय. मी दवाखान्यात जात नाहीये, असं त्यांनी सांगितलं.
याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. कार कुणाची आहे याची माहिती पोलीस घेत आहे. यामागे काही घातपात किंवा षडयंत्र होतं का याचीही पोलीस चौकशी करणार आहेत. पोलिसांना चौकशी करू द्या, असं त्या म्हणाल्या. यापूर्वी बीएसएफचा ड्रेस घालून एक व्यक्ती ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसला होता.