‘दिल चाहता है’ चा आमिर बनायला गेला ! तोंडात टाकला जिवंत मासा, पण..
'दिल चाहता है' चित्रपटातील आमिर, सैफ आणि अक्षय खन्नाची ट्रीप सर्वांनाच आठवत असेल. तिथे ते मासेमारी करत असताना आमिर एक अख्खा मासा तोंडात घालतो, असे दाखवण्यात आले होते. तशीच पुनरावृत्ती तामिळनाडूमध्ये झाली पण..

‘दिल चाहता है’ हा चित्रपट पाहिला नाही किंवा तो आवडला नाही, अशी व्यक्ती एखादीच असेल, 2001 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात ती मित्रांची यारी, दोस्ती, त्यांचं नातं,जीवाला जीव लावणं खूप सुंदर पद्धतीने दाखवलं होतं. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गोव्याची ट्रीपही मस्त दाखवली होती, तो भाग तर अनेकांचा आवडता असेल, याच गोवा ट्रिपदरम्यान आमिर, सैफ आणि अक्षय खन्ना हे तिघे मासे पकडायला जातात आणि त्यापैकी पकडलेला एक अख्खा मासा आमिर खान तसाच खाण्याचा प्रयत्न करतो असं दाखवण्यात चित्रपटात आलं होतं. तो सीन प्रचंड लोकप्रिय झाला होता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं आम्ही का सांगतोय ? तर त्याचं उत्तर म्हणजे आमिरच्या त्याच सीनची किंवा त्याच कृतीची म्हणूया पुनरावृत्ती तामिळनाडूतल्या एका इसाने केली, पण तो प्रयत्न त्याच्यावरच उलटला आणि अगदी जीवावर बेतला ! हो, हे खरं आहे, तामिळनाडूच्या चेंगलपट्टु येथून एक घाबरवणारी बातमी समोर आली आहे. तेथे मदुरन्थकम येथील एका इसमाने जिवंत मासा खाण्याचा प्रयत्न केला. त्याने तो तोंडातही टाकला,मात्र त्याच माशाने त्याचा जीव घेतला. अरयापक्कम गावातील 29 वर्षांचा मणिगंदन हा रोजंदारीवर काम करणारा कामगार होता आणि त्याला उघड्या हातांनी तलावांमध्ये मासेमारी करण्याची सवय होती.
दुसऱ्या माशाचा मोह नडला आणि..
मंगळवारी कीझवलम तलावातील पाण्याची पातळी कमी असल्याचे पाहून तो तिथे गेला होता. तेथे त्याने एक मासा पकडला पण तेवढ्यात त्याला दुसरा मासाही दिसला, तो पाहून मणिगंदनने आधी पकडलेला, जिवंत मासा त्याच्या तोंडात घातला. तो त्याने अशा प्रकारे घातला की त्या माशाचे डोके त्याच्या घशाच्या दिशेने असेल जेणेकरून तो हलू नये आणि घसरू नये.
तोंडातल्या माशाने घेतला जीव
मात्र दुसरा मासा पकडण्यासाठी तो खाली वाकला आणि घात झाला. कारण तो खाली वाकताच स्थआनिक भाषेत ‘पनंगोट्टई’ नावाने ओळखला जाणारा त्याच्या तोंडातील मासा, त्याच्या घशात घुसू लागला. आणि श्वास घुसमटल्याने मणिगंदनची अवस्था बिकट झाली. ते पवाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तोंडातील मासा बाहेर काढण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यांना तसं करता आलं नाही. कारण त्या माशाच्या वरच्या बाजूला असलेला काटे, घशाच्या भिंतीला टोचत होते. त्याला ताबडतोब जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दुर्दैवाने मणिगंदनला मृत घोषित करण्यात आले. अवघ्या एका माशामुळे त्याला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला.
दरम्यान महिन्याभरापूर्वी केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे शेतात मासेमारी करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मासेमारी करताना, तो माणूस आधीच पकडलेला मासा तोंडात धरत होता आणि नंतर तो मासा त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव आदर्श उर्फ उन्नी (25) असे होते, तो पुथुप्पल्ली येथील रहिवासी होता.