इस्रो लवकरच गाठणार नवा ऐतिहासिक टप्पा, चंद्रानंतर आता या ग्रहावर जाणार भारत
भारतीय अंतराळ संस्था इस्रो पुन्हा एकदा नवीन इतिहास रचण्यासाठी सज्ज होत आहे. इस्रोने चंद्रयान २ मोहिम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता ते मंगळावर जाण्याचा विचार करत आहेत. यासाठी इस्रोने तयारी सुरु केली आहे. इस्रो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ही मोहिम राबवणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था लवकरच एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. चंद्रयान ३ मोहिम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता इस्रो मंगळावर रोव्हर आणि हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका आणि चीनला यामध्ये यश आले आहे. अशा स्थितीत भारत अवकाशा आपला नवा ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे. इस्रोच्या या नवीन प्रकल्पाला मंगळयान-2 असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हे एक अभूतपूर्व मिशन आहे, जे भारतातील सर्वात वजनदार रॉकेट – लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM3) वापरून ISRO ने विकसित केले आहे.
नव्या पद्धतीचे करणार अवलंब
अहवालानुसार, एअरबॅग आणि रॅम्पसारख्या पारंपारिक पद्धतींना आता अलविदा म्हटले जाणार आहे. इस्रो आता आपला रोव्हर प्रगत अशा स्काय क्रेनद्वारे मंगळावर उतरणार आहे. नासाच्या रोव्हर लँडिंगपासून ही प्रेरणा घेतली गेली आहे. यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही सुरक्षित आणि अचूक लँडिंग सुनिश्चित होऊ शकेल. रोव्हर मंगळाच्या परिसरात सुरक्षितपणे उतरवले जाणार आहे. इस्रो सुपरसॉनिक पॅराशूट विकसित करत आहे, जे या मोठ्या मोहिमेच्या यशासाठी आवश्यक आहे.
नवीन द्रव रॉकेट इंजिनची चाचणी
PSLV ला उर्जा देण्यासाठी नवीन द्रव रॉकेट इंजिनची नुकतीच यशस्वी चाचणी झाली. सिंगल पीस रॉकेट इंजिन 97 टक्के कच्च्या मालाची बचत करते आणि उत्पादन वेळ 60 टक्के कमी करते. हे ऍडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केले गेले आहे. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरमध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलीये. हे प्रक्षेपण वाहनाची क्षमता वाढवेल अशा प्रकारे त्याचे डिझाईन करण्यात आले आहे. यामुळे त्याला यश मिळण्याची शक्यता वाढते. 9 मे 2024 रोजी 665 सेकंदांच्या कालावधीसाठी एएम तंत्रज्ञानासह उत्पादित लिक्विड रॉकेट इंजिनच्या यशस्वी हॉट चाचणीसह मोठा टप्पा गाठला गेला.
भारताने चंद्रयान ३ मोहिम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता मंगळयान २ मोहिमेची उत्सूकता वाढली आहे. इस्रो ही मोहिम देखील यशस्वीपणे राबवेल असा विश्वास सर्व भारतीयांना आहे.