Manipur Curfew : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; राज्यातील काही भागात कर्फ्यू, शाळा, बाजार बंद
Manipur Violence: मणिपूर अजूनही अशांत आहे. आता ताज्या हिंसाचारात दोन गट पुन्हा भिडले. त्यामुळे अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला. समाजाचे झेंडे लावण्यावरून हा वाद पेटला. शाळा, बाजार बंद करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

मणिपूर अजूनही अशांत आहे. येथे शांतता नांदण्यासाठीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चुदाचांदपूर जिल्ह्यातील काही भागात दोन वेगवेगळ्या जमातींमध्ये वाद होता. आता ताज्या हिंसाचारात दोन गट पुन्हा भिडले. त्यामुळे अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला. समाजाचे झेंडे लावण्यावरून हा वाद पेटला. शाळा, बाजार बंद करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. किरकोळ कारण पुढे करत काही असामाजिक तत्व मुद्दाम हिंसाचार घडवून आणत असल्याचे दिसते.
मंगळवारी चुराचांदपूर उप मंडळातील के. व्ही मुनहोईह आणि रेंगकाई गावांमध्ये वादग्रस्त भागात सामुदायिक झेंडे फडकवल्यानंतर झोमी आणि हमार जमातींमध्ये तणाव निर्माण झाला होता. चुराचांदपूरचे जिल्हाधिकारी धारून कुमार यांनी दोन गावांमध्ये आणि कांगवई, समुलामलान आणि संगाईकोट उप मंडळात कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांना अत्यावश्यक सेवा आणि आवश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी 17 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील इतर भागात सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यूमध्ये सवलत देण्यात येईल. तर सध्यस्थितीवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून असेल.
प्रशासनाकडून शांततेचे आवाहन




रेंगकाई आणि वही मुनहोईह या गावातील अधिकाऱ्यांनी चुराचांदपूरचे उपायुक्त आणि पोलीस अधिक्षक यांच्यासह गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. प्रशासनाने गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवण्याची तंबी दिली. गावकऱ्यांनी त्यांना साथ देण्याचे तसेच शांततेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी
या दोन्ही गावांमध्ये कोणताही जमीन वाद होऊ नये यासाठी दोन्ही गावातील लोकांची सहमती झाली आहे. यापूर्वी 18 मार्च रोजी चुराचांदपूर शहरात जोमी आणि हमार या दोन जमातींमध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. तर इतर अनेक जण जखमी झाले होते. जोमी जमातीचा झेंडा मोबाईलच्या टॉवरवरून खाली फेकण्यात आल्यानंतर दोन्ही गटात हिंसा भडकली होती. सध्या स्थिती आटोक्यात असून हिंसेची नवीन घटना समोर आलेली नाही.