Mansoon Update: वेळेआधीच दाखल होणार मान्सून, पाहा कधी होणार पावसाची एन्ट्री
महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबईत देखील अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार पाहा मान्सून कधी दाखल होऊ शकतो.
मुंबई : हवामान खात्याने (IMD) सांगितले की, नैऋत्य मान्सून त्याच्या नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच पुढे सरकत आहे. IMD नुसार, नैऋत्य मान्सून 19 मे च्या सुमारास दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होणार आहे. याशिवाय तो त्याच दिवशी दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागातही प्रवेश करणार आहे. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून या भागात पोहोचतो, मात्र यंदा तो तीन दिवस आधी दाखल होणार आहे. आज मुंबईसह उपनगरामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
केरळमध्ये साधारणपणे १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो. 15 जुलैदरम्यान तो संपूर्ण देशात पोहोचतो. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आधीच हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात मान्सूनचा पाऊस ± 5% च्या फरकाने सुमारे 106% अपेक्षित आहे, जो “सामान्यपेक्षा जास्त मानला जातो. ”
1971-2020 पर्यंतच्या दीर्घकालीन आकडेवारीच्या आधारे संपूर्ण हंगामातील दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमान 87 सेमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विगेल्या वर्षी मान्सूनचा दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस ९४.४% म्हणजेच “सामान्यतेपेक्षा कमी” होता. IMD च्या मते, त्यापूर्वी 2022 चा मान्सून LPA च्या 106% वर “सामान्यपेक्षा जास्त” होता; 2021 मध्ये दीर्घ कालावधीतील मान्सूनचा सरासरी पाऊस 99% वर “सामान्य” आणि 2020 मध्ये पुन्हा “सामान्यपेक्षा 109%” नोंदवला गेला. IMD ने म्हटले आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक अद्यतनित अंदाज पुन्हा जारी केला जाईल, ज्यामध्ये उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि ईशान्य भारतातील मान्सूनची स्थिती आणि अंदाज याविषयी माहिती अद्यतनित केली जाईल.
पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता
दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागांवर चक्रीवादळाचे परिवलन आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (40-60 किमी प्रतितास) मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
14 मे रोजी गुजरात आणि परिसरात वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या काळात ताशी 30-40 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. IMD नुसार, 14 मे मध्य प्रदेशात तुरळक गारपिटीचीही शक्यता आहे. हिमालयसह पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.