लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांचं लग्न ठरलं आहे. येत्या 26 तारखेला गुरुग्राममध्ये हे लग्न होणार आहे. त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पण ही यादी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या लग्नाचं फक्त बसपाच्या नेत्यांनाच आमंत्रण देण्यात आलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याशिवाय मायावती यांच्या कुटुंबीयातील लोकही या लग्नात सहभागी होणार आहेत. मायावती यांना हा लग्न सोहळा पूर्णपणे घरगुती करायचा आहे. त्यांना हा सोहळा पूर्णपणे राजकारणापासून दूर ठेवण्याचा मायावती यांचा प्रयत्न आहे. आकाश आनंद हे बसपाचे नॅशनल को-ऑर्डिनेटर आहेत.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नपत्रिका इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना देण्यात आलेली नाही. 26 मार्चला हा लग्न सोहळा होणार आहे. त्यानंतर 28 मार्च रोजी रिसेप्शन होणार आहे. त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पण ही यादी गुप्त ठेवण्यात आली आहे. या यादीत कुणाकुणाची नावे आहेत, ते माहीत नाही. आकाश आनंद यांचं लग्न 26 मार्च रोजी गुरुग्रामच्या एम्बियन्स आयलँड येथील ‘ए डॉट बाई जीएनएच’ येथे होणार आहे.
बसपाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या मुलीशी आकाश आनंद यांचा विवाह होणार आहे. सिद्धार्थ यांची कन्या प्रज्ञाने एमबीबीएसची पदवी घेतली आहे. एमडी बनण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आकाश यांचे होणारे सासरे सिद्धार्थ हे मायावती यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. मायावती यांच्या सांगण्यावरूनच सिद्धार्थ यांनी डॉक्टरकी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं होतं. नंतर राज्यसभेतही पाठवण्यात आलं होतं. सिद्धार्थ बसपाच्या अनेक राज्यांचे प्रभारीही आहेत.
आकाश आनंद यांच्या लग्नाचं बसपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात पक्षाचे खासदार, प्रदेशाध्यक्ष, मंडल प्रमुख, जिल्हा आणि इतर पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी यांचा समावेश आहे. या शिवाय कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना लग्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. राजकारणापासून हा सोहळा दूर राहावा म्हणून मायावती यांनी इतर राज्यातील नेत्यांना लग्नपत्रिका दिलेली नाहीये.