भोपाळ : एमबीबीएसची विद्यार्थीनी शिवरंजनी तिवारी हिला बागेश्वर बाबाशी लग्न करायचं आहे. त्यामुळे ती काल शनिवारी बागेश्वर धामसाठी निघाली आहे. 1300 किलोमीटरची पदयात्रा करत ती 16 जूनला बागेश्वर धामला पोहोचणार आहे. बागेश्वर धामला जाऊन ती बागेश्वरबाबांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवणार आहे. मात्र, 15 जूनपासून बागेश्वर बाबा हे एकांतवासात जाणार आहेत. त्यामुळे शिवरंजनी निराश झाली आहे. मात्र, मी त्यांच्या भक्तीत कोणतीही अडचण निर्माण करणार नाही, असं शिवरंजनीने म्हटलं आहे.
बागेश्वर बाबाशी भेट होण्याची शिवरंजनीला आशा आहे. बागेश्वरधाममधून कोणीच खाली हात गेलेलं नाही. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलंय, असं सांगतानाच मन में बसाकर तेरी मूर्ति, उतारू मैं प्राणनाथ तेरी आरती… अशी कविताही तिने ऐकवली. मी गंगोत्री धाममधून निघाले आहे. 1300 किलोमीटरची माझी पदयात्रा आहे. 50 डिग्री तापमान आहे. रणरणतं ऊन आहे. पण मला त्याची पर्वा नाही. मी लवकरच बागेश्वर धाममध्ये पोहोचणार आहे, असं ती म्हणाली.
माझा माझ्या बालाजी सरकारवर विश्वास आहे. त्यांच्या दरबारात जो कोणी जातो तो निराश होत नाही. हृदयातून निघालेला आवाज कधीच वाया जात नाही. देवही तो आवाज ऐकतो. त्यामुळेच माझ्या प्राणनाथा मला दर्शन द्या. मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, असं ती म्हणाली. शिवरंजनी अवघ्या 20 वर्षाची आहे. परंतु, जेव्हापासून तिने बागेश्वर बाबाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासून ती चर्चेत आली आहे. आपल्या इच्छेचा कलश घेऊन ती बागेश्वर धामकडे निघाली आहे. ती बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र शास्त्री यांना प्राणनाथ म्हणून संबोधत असते. तर बागेश्वर बाबा तिला मुलीसारखं मानतात. बागेश्वरबाबा तुम्हाला मुलगी मानतात असं त्यांना विचारताच मी कधी असं ऐकलं नाही. त्याबाबत मला माहीत नाही, असं शिवरंजनी म्हणाली.
बागेश्वरबाबांनी लग्नाला नकार दिला तर काय कराल? असा सवाल तिला करण्यात आला. त्यावर ती हसली. मी लग्न करायला चालले असं मी कधीच म्हटलं नाही. मी फक्त लग्नाचा प्रस्ताव घेऊन निघाले आहे. मी त्यांना प्राणनाथ म्हणते. ते माझे प्राणनाथ आहेत. यापुढेही राहतील. मी त्यांना देव मानते. त्यामुळेच त्यांना प्राणनाथ म्हणत असते. 16 जूनपर्यंत बागेश्वर धामला पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे एखाद दोन दिवस मागेपुढे होऊ शकतात, असं तिने सांगितलं.