‘लष्करानं या गोष्टीचा नक्की विचार करावा…’, पहलगाम हल्ल्यानंतर बुलडोझर कारवाईवर मेहबूबा मुफ्ती यांचं मोठं वक्तव्य
पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घर उद्ध्वस्त केली जात आहेत, यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. जम्मू काश्मीरच्या विविध भागांमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त करण्यात येत आहेत, काहींचे घर बॉम्बनं उडून देण्यात आले आहेत, तर काहींच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलं आहे.भारतीय सुरक्षा दलाकडून दहा पेक्षा अधिक दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. सैन्याकडून सुरू असलेल्या या कारवाईसंदर्भात जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सैनिकांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे, मात्र त्यांनी सतर्कता बाळगावी असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या मुफ्ती?
कारवाई सुरू असताना निरपराध व्यक्ती आणि दहशतवादी यांच्यामधील अंतर स्पष्ट करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाची अखंडता कायम राहील, नागरिक बंड करणार नाहीत. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सध्या काश्मीरमध्ये लोकांची धरपकड सूरू आहे. हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांसोबत सामान्य नागरिक देखील भरडले जात आहेत. ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांमध्ये काही निरपराध लोकांची देखील घरं होती, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सावधानी बाळगावी, दहशतवादी आणि नागरिक यामधील अतंर स्पष्ट करणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यात काही निर्दोष लोक देखील आहेत. अशा बातम्या समोर येत आहेत की हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे, दहशतवाद्यांसोबतच सामान्य लोकांची घर देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.मी सरकारला विनंती करते की त्यांनी सैन्यांना असे आदेश द्यावेत की, दहशतवादी लोकांवर कारवाई करताना काश्मीरच्या सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता सरकारनं जम्मू -काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. अनेकांची चौकशी सुरू आहे.