नरेंद्र मोदींनी महत्वाच्या बैठकीसाठी पाकिस्तान दौरा टाळला, पण घेतला असा निर्णय

| Updated on: Oct 04, 2024 | 6:29 PM

भारत-पाकिस्तानचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये ताणले गेलेले असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानच्या दौऱ्याचं निमंत्रण आलं होतं. पण मोदी यांच्याऐवजी एस जयशंकर पाकिस्तानला जाणार आहेत.

नरेंद्र मोदींनी महत्वाच्या बैठकीसाठी पाकिस्तान दौरा टाळला, पण घेतला असा निर्णय
Image Credit source: ANI
Follow us on

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १५ आणि १६ ऑक्टोबरला एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी एस जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहेत. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये आयोजित बैठकीसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, मोदी यांच्या ऐवजी एस जयशंकर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य आशियाच्या राजकीय दृष्टीकोनातून ही संस्था महत्त्वाची मानली जाते. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचं यजमान पद गेल्या वर्षी भारताकडे होतं. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर होते. त्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री आता पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत.

काय आहे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन?

SCO ची सुरुवात 15 जून 2001 ला झाली आहे. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली. वंशिक आणि धार्मिक मतभेद दूर करण्याचा आणि व्यापार-गुंतवणूक वाढवण्यासाठीचा ठराव यामध्ये करण्यात आला होता. एससीओ (SCO) ही अमेरिकेचं वर्चस्व असलेल्या नाटोला रशिया आणि चीनचं प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जातं.

SCO आणि भारत

2017 मध्ये भारत SCOचा पूर्णवेळ सदस्य झाला. याआधी 2005 पासून भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आला होता. 2017 मध्ये एससीओच्या 17 व्या शिखर परिषदेमध्ये या संघटनेच्या विस्तारासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आणि भारत आणि पाकिस्तान या देशांना सदस्य करून घेण्यात आलं. यामुळे या संघटनेच्या सदस्यांची संख्या 9 झाली.

दरम्यान, गेल्या 9 वर्षांमध्ये पहिल्यांदा कुणी मंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, एस जयशंकर यांचा पाकिस्तान दौरा हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठीचं पाऊल आहे का? त्यावर रणधीर जायसवाल यांनी सांगितलं की, “भारत SCO चार्टरसाठी प्रतिबद्ध आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याचं केवळ हेच कारण आहे. या दौऱ्याचा दुसरा कोणताही अर्थ काढू नये.”

पाकिस्तानने 29 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SCO च्या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मुमताज जहरा बलोच यांनी सांगितलं होतं की, “या बैठकीत भाग घेण्यासाठी सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.” यानंतर 30 ऑगस्टला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दोन्ही देशांच्या ताणलेल्या संबंधांवर भाष्य केलं होतं. पाकिस्तानसोबत बातचित करण्याची वेळ आता संपली आहे. “प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं आहे. मुद्दा संपला आहे. आता आम्ही पाकिस्तानसोबत कोणतं नातं ठेवण्याबाबत का विचार करावा”, असं एस जयशंकर म्हणाले होते.