खवळलेल्या समुद्रातील बेपत्ता मुलाला गणपती बाप्पानं वाचवलं, आईबापांनी आशाच सोडली; काय घडलं?
आईवडिलांसोबत चौपाटीवर फिरायला गेलेला एक 13 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाला. आईवडिलांसमोरच तो खोल समुद्रात बुडाला. त्याचा कसून शोध घेऊनही तो सापडला नाही. सर्वांनीच आशा सोडली. पण 24 तासानंतर तो परतला. कसा?
सुरत | 2 ऑक्टोबर 2023 : जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो… असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती नेहमी येत असते. बुडत्याला काडीचा आधार व्हावा तसं होतं आणि मृत्यूच्या दाढेतून माणूस बाहेर येतो. कुणी याला चमत्कार म्हणतात, तर कुणी याला विल पॉवरची शक्ती. कुणी काही म्हणो, पण काहीच आशा नसताना काही तरी घडतं आणि माणसाला अभय मिळतं. समुद्र किनारी फिरायला गेलेल्या जोडप्याच्या बाबतही असंच घडलं. डोळ्यांसमोर खवळलेल्या समुद्रात मुलगा बुडाला. सर्वच आशा सोडल्या. पण चमत्कार व्हावा असं झालं. 24 तासानंतर लहान मुलगा जिवंत परतला. तोही केवळ गणपती बाप्पांमुळे. कसं काय?
29 ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता सुरतच्या दुम्मस बीचवर हा धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार घडला. एक दाम्पत्य आपल्या 13 वर्षाच्या मुलासह दुम्मस बीचवर फिरायला आले होते. यावेळी हा मुलगा समुद्रात अंघोळीसाठी गेला. समुद्रात पोहोत असताना तो थोडा दूर गेला. अचानक समुद्राचं पाणी वाढलं. लाटा उसळू लागल्या. उंचच उंच लाटा उसळल्याने त्याने वाचवण्यासाठी धावा केला. त्यामुळे समुद्राच्या किनारी प्रचंड गर्दी झाली. मुलाचे आईवडीलही मुलाला बुडताना पाहत होते. पण काहीच करू शकत नव्हतं. बाकीच्या लोकांचीही तिच परिस्थिती होती. इच्छा असूनही कोणीच खवळलेल्या समुद्रात जायला तयार नव्हता. त्यानंतर मुलगा मेला असं समजून त्याचे आईवडील परत आले.
हताश आणि निराश
दुसरीकडे सुरत पोलीस प्रशासनाने या मुलाचा शोध घेण्यासाठी पाणबुड्या आणि अग्निशमन दलाची मदत घेतली. तसेच या मुलाचा शोध घेण्यासाठी हजीारा औद्योगिक क्षेत्रातील बड्या कंपन्यांची मदतही घेतली. प्रचंड शोधाशोध केली. पण या मुलाचा काहीच शोध लागला नाही. सर्वच हताश आणि निराश झाले.
आशाच सोडली
आपला 13 वर्षाचा लाडका मुलगा लखन देवीपूजक हा जिवंत असल्याची आसच त्याचे आईवडील सोडून बसले होते. कारण तो समुद्रात बेपत्ता होऊन 24 तास झाले होते. पण इतक्यात चमत्कार घडावा अशी घटना घडली. या मुलाच्या आईवडिलांना आनंदाची बातमी मिळाली. 24 तास समुद्रात राहूनही तुमचा मुलगा जिवंत आहे, तो नवसारीजवळ जिवंत सापडलाय असं या कुटुंबीयांना सांगण्यात आलं. मुलगा जिवंत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. आई वडिलांनी मुलाला भेटण्यासाठी नवसारीच्या दिशेने धाव घेतली.
काय घडलं?
24 तास समुद्रात राहूनही हा मुलगा जिवंत राहिलाच कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या मुलाचा आणि गणपती बाप्पाचा संबंध काय? असा प्रश्नही मनात आला असेल. त्याचं झालं असं… खोल समुद्रात बुडत असतानाच लखनच्या हाताला गणपतीची एक मूर्ती लागली. या मूर्तीच्या खालच्या भागाचा त्याला आधार मिळाला. ही भली मोठी मूर्ती उलटी झाली होती. तिचा खालचा भाग वर आला होता. त्यात लखन बसला आणि 24 तास समुद्रात तरंगत राहिला. तिकडे सुरत पोलीस. फायर विभाग आणि लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्पीड बोटांनी त्याला समुद्रात शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती यश आलं नाही.
मच्छिमारांना दिसला
मात्र, नवसारी येथे समुद्रात मासेमारी करण्यासाठी भवानी बटचे मच्छिमार चालले होते. त्यांना हा मुलगा समुद्रात दिसला. ते तात्काळ या मुलाजवळ गेले. त्याला बोटीत बसवलं. आणि मत्स्य पालन विभागाच्या बिंदू बेन यांना याची माहिती दिली. बिंदू बेन यांनी सुरत मरीन पोलिसांना कळवलं. सुरत मरीन पोलिसांनी दुम्मस पोलीस प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्याला दवाखान्यात दाखल करून त्याच्या तपासण्या सुरू केल्या. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीत आहे.