मोबाईलवर गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीदेखील खेळत असाल तासंतास गेम तर व्हा सावध!
मोबाईलवर गेम खेळात असताना एक बालक गंभीररित्या भाजला गेल्याची घटना समोर आली आहे.
मथुरा, उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मोबाईलवर गेम खेळत असताना मुलाच्या हातातील मोबाईलचा अचानक स्फोट (Mobile Blast) झाला. या घटनेने खळबळ उडाली. मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलाच्या हाताला व तोंडाला दुखापत झाली. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले. मथुरा (Mathura) शहरातील कोतवाली भागात असलेल्या मेवाती परिसरात ही घटना घडली आहे. तेथील एका घरातून स्फोटाचा आवाज आल्याने येथे एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून लोकं घटनास्थळी पोहोचले असता तेथे मोबाईलचा स्फोट झाल्याचे दिसले व त्या मोबाईलवर गेम खेळणारा बालक गंभीररित्या भाजल्या गेला होता. मुलाला पाहताच कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात केले दाखल
या घटनेची माहिती देताना मेवाती परिसरातील रहिवासी मोहम्मद जावेद यांनी सांगितले की, त्यांचा 13 वर्षांचा मुलगा मोहम्मद जुनैद मोबाईलवर गेम खेळत होता. घरात गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलचा स्फोट झाल्याने जुनैद गंभीररित्या भाजला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या मोहम्मद जुनैदला डॉक्टरांनी दाखल करून उपचार सुरू केले.
हृदयाला दुखापत
आपत्कालीन डॉक्टर टिकेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, मुलाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी अल्ट्रासाऊंड केले जात आहे. त्यानंतर परिस्थिती काय आहे हे कळेल. जुनैदच्या हृदयाच्या बाजूला जास्त जखम आहे.
एमआय कंपनीचा मोबाईल
जुनैदचे वडील मोहम्मद जावेद यांनी सांगितले की, काही वेळापूर्वी त्यांनी एमआय कंपनीचा मोबाईल घेतला होता. कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती, पण मोबाईलचा अचानक स्फोट कसा झाला कळले नाही.