नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर आता नवं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतल्यानंतर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आलाय. त्याचबरोबर मांडवीय यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयही असणार आहे. विद्यमान केंद्रीय मंत्रि स्मृती इराणी यांच्याकडे फक्त महिला व बालविकास खात्याची जबाबदारी राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असणार आहे. (New cabinet allocation announced after Union Cabinet expansion)
मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता पियुष गोयल यांच्याकडून रेल्वे खातं काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे आता वस्त्रोद्योग मंत्रालयासह वाणिज्य आणि उद्योग खात्याची जबाबदारी असेल. तर अश्विनी वैष्णवर यांच्याकडे रेल्वे खातं देण्यात आलंय. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान खातंही अश्विनी वैष्णव यांच्याकडे असणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडील पेट्रोलियम मंत्रालय काढून घेण्यात आलं असून त्यांच्याकडे आता केंद्रीय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर हरदीपसिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खातं देण्यात आलंय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी उड्डयण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. तर पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे मत्स्य आणि दुग्धविकास मंत्रालय देण्यात आलं.
केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालय असणार आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदावरुन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या अनुराग ठाकूर यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण खात्याची जबाबदारीही अनुराग ठाकूर यांच्याकडेच देण्यात आलीय. गिरीराजसिंह यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
पशुपती पारस यांच्याकडे अन्न व प्रक्रिया मंत्रालय सोपवण्यात आलंय. भुपेंद्र यादव यांच्याकडे केंद्रीय कामगार आणि पर्यावरण मंत्रालय देण्यात आलं आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुंजपारा यांच्याकडे महिला व बालविकास खातं देण्यात आलंय. तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयासह कायदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे ईशान्य विकास आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नारायण राणे यांच्याकडे लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी, भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय देण्यात आलंय. तर भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ही महत्वाची जबाबदारी देण्यात आलीय.
संबंधित बातम्या :
‘कोण कुणाला अंगावर घेतं बघू’, नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान
New cabinet allocation announced after Union Cabinet expansion