राष्ट्रवादीत घमासान: अजित पवार गटातून का कोणालाही मंत्रिपदासाठी फोन नाही, पडद्यामागे नेमके काय घडले?
modi cabinet 3.0 ncp leader ajit pawar: मोदी 3.0 मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी समारंभात प्रत्येक पक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद न मिटल्यामुळे पीएमओतून राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदार फोन गेला नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा, असे भाजप हायकंमाडने राष्ट्रवादीमधील नेत्यांना सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळास आज सुरुवात होणार आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी समारंभ संध्याकाळी होत आहे. या वेळी करण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अद्याप कोणालाही फोन आला नाही. कोणाचेही नाव समोर आलेले नाही. त्याचे कारण समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नाराजी नाट्य त्यासाठी कारणीभूत आहे. यामुळे आधी तुमच्या पक्षात असलेली नाराजी दूर करा, असे भाजप हायकंमाडने त्यांना सांगितले आहे.
काय सुरु आहे राष्ट्रवादीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन जण खासदार आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेतील खासदार आहेत तर सुनिल तटकरे लोकसभेतून निवडून आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपआपला दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु दोघांपैकी कोण? यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फोन गेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार सकाळीच दाखल
प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यात सुरु असलेल्या वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी दीड तास बैठक झाली. त्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी वाद मिटवावा, यासाठी चर्चा झाली. परंतु शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे दीड तासाच्या बैठकीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस बैठकीतून बाहेर निघाले.
भाजप हायकंमाडच्या सूचना
मोदी 3.0 मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी समारंभात प्रत्येक पक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद न मिटल्यामुळे पीएमओतून राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदार फोन गेला नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा, असे भाजप हायकंमाडने राष्ट्रवादीमधील नेत्यांना सांगितले आहे.
भुजबळ यांचे नाव चर्चेत
प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी संधी द्या, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गटाने ही मागणी केली आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसी चेहरा मंत्री झाल्यास पक्षाला फायदा होईल, असे कार्यकर्ते सांगत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभास महाराष्ट्रातून १४०० लोकांना समारंभासाठी बोलवले. एकूण आठ हजार जण या सोहळ्यासाठी येणार आहे. त्यात भारताच्या शेजारील राष्ट्रांचे प्रमुख येत आहेत.