मोदी सरकारने बोलवले संसदेचं विशेष अधिवेशन, यंदा काय होणार मोठी घोषणा?
मोदी सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काय मोठी घोषणा होते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदी काय मोठा निर्णय घेतात याकडे विरोधकांचं ही विशेष लक्ष लागून आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात कोणती मोठी घोषणा होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. याआधी कलम ३७० हटवण्याची मोठी घोषणा मोदी सरकारने संसदेत केली होती. त्यामुळे या विशेष अधिवेशनात काय मोठी घोषणा होणार याकडे लक्ष लागून असणार आहे. यासाठी सरकारने एक दिवस आधी सर्व पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती घोषणा होणार याबाबत सर्वांना माहिती दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
केंद्रीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 17 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण आणि घटनादुरुस्ती यासह अनेक विधेयके मांडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले असल्याने काँग्रेस सातत्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या अधिवेशनाचा अजेंडा काय असणार आहे. याबाबत सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी सरकारने अजेंडा काय आहे हे सांगितले पाहिजे अशी मागणी काँग्रेसची आहे. त्यानुसार आता एक दिवस आधी सर्व पक्षाच्या नेत्यांना ही माहिती दिली जाणार आहे.
‘संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले आहेत. एक व्यक्ती वगळता या अधिवेशनाचा अजेंडा कुणालाच माहिती नाही.’ अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.