नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काल कोरोना पसरण्यास काँग्रेस (congress) कारणीभूत असल्याचं काल संसदेत सांगितलं. कोरोनाच्या (corona) संकटात काँग्रेसने मुंबईतील यूपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा, असं काँग्रेसचे लोक म्हणत होते, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने मोदींच्या या वक्तव्याचा निषेध करत आघाडी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची जंत्रीच सादर केली आहे. तर राष्ट्रवादीने कोरोना पसरण्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात राज्यसरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले. आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला. ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवण्याचा आरोप केला त्याला नवाब मलिक जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था आम्हीच केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तरप्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या. परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं भोगत आहेत, असा हल्लाही मलिक यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका