Mohali Blast : मोहालीत गुप्तचर विभागाच्या इमारतीवर ग्रेनेड हल्ला? स्फोटामुळे परिसरात घबराट, जीवितहानी नाही
रॉकेटद्वारे डागण्यात येणारं ग्रेनेड इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फेकण्यात आलं, असं बोललं जात आहे. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, गुप्तचर विभागाच्या इमारतीसह आजूबाजूच्या इमारतींच्या काचा या स्फोटामुळे फुटल्या आहेत.
नवी दिल्ली : मोहालीच्या (Mohali) सोहानामध्ये गुप्तचर विभागाच्या कार्यालयासमोर मोठा धमाका झाला आहे. सोमवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास हा धमाका झाला. हा स्फोट (Blast) इतका मोठा होता की संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या आहेत आणि हा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. स्फोटाची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ पाहायला मिळाली. एसएसपी आयजी घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरु केलाय. मोहालीतील गुप्तचर विभागाच्या (Intelligence department) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट घडवून आणण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार रॉकेटद्वारे डागण्यात येणारं ग्रेनेड इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फेकण्यात आलं. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, गुप्तचर विभागाच्या इमारतीसह आजूबाजूच्या इमारतींच्या काचा या स्फोटामुळे फुटल्या आहेत.
RPG द्वारे ग्रेनेड हल्ला?
हा हल्ला RPG द्वारे करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ANI ने दिलेल्या फोटोमध्ये हल्ला करण्यात आलेले ग्रेनेड दिसत आहे. मात्र, हा दहशतवादी हल्ला असल्याची पुष्टी अद्याप पंजाब पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. हा एक छोटा स्फोट होता असं पंजाब पोलिसांनी म्हटलंय. स्फोटानंतर घटनास्थळावर फॉरेन्सिक टिम दाखल झाली आहे. सोबतच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घटनेचा अहवाल तातडीने मागवला आहे.
A minor explosion was reported at the Punjab Police Intelligence headquarters in sector 77, SAS Nagar at around 7:45pm. No damage has been reported. Senior officers are on the spot and investigation is being done. Forensic teams have been called: Mohali Police
— ANI (@ANI) May 9, 2022
इमारतीमधील स्फोटकांचाच स्फोट?
गुप्तचर विभागाच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंजाब सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला दहशतवादी हल्ला नाही. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडे स्फोटकं आहेत. त्याचाच हा स्फोट आहे. घटनास्थळावर पोलीस दलातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चंदीगडचे एसएसपी कुलदीप चहलही उपस्थित आहेत. पोलीस घटनास्थळाच्या आसपास असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
भगवंत मान पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात
मुख्यमंत्री भगवंत मान या प्रकरणी डीजीपींसोबत चर्चा करतील आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतील असं सांगितलं जात आहे. ते सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे हा दहशतवादी हल्ला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. इमारतीमध्येच काही स्फोटकं आहेत आणि त्याचाच स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.