सस्पेन्स संपला, भाजपचं पुन्हा धक्कातंत्र, मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री अखेर ठरला!
मध्य प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून अखेर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने धक्कातंत्र देत मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लावली आहे. विशष म्हणजे या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती.
भोपाळ | 11 डिसेंबर 2023 : विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊन आठ दिवस उलटून गेले तरी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटत नव्हता. मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता होती. या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक भाजप नेत्यांची चेहरे चर्चेत होती. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या गोटात बैठकांवर बैठका पार पडत होत्या. भाजपचे वरिष्ठ नेते राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत सविस्तर चर्चा करत होते. प्रत्येकाचं मत जाणून घेत होते. अखेर प्रदीर्घ बैठकांच्या सत्रानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स आज अखेर संपला आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आता मोहन यादव यांची वर्णी लागला आहे. मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देणं हे भाजपचं मोठं धक्कातंत्र असल्याचं मानलं जात आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपला तब्बल 163 जागांवर विजय मिळालाय. तर काँग्रेसचा अक्षरश: सुपडा साफ झाला. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 66 जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण बनेल? याबाबत उत्सुकता होती. अनेक दिग्गज नेत्यांची नावे शर्यतीत होती. पण भाजपने धक्कातंत्र देत मोहन यादव यांची निवड केली आहे.
मोहन यादव कोण आहेत?
मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. ते उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर आता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असल्याची सध्या चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांचा हा प्रस्ताव आमदारांनी बहुमताने मान्य केला.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याआधी महत्त्वाच्या घडामोडी
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याआधी आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भाजपने पक्षाच्या पर्यवेक्षकांची एक टीम भोपाळला पाठवली होती. यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आशा लाकडा आणि के लक्ष्मण यांचा समावेश होता. हे सर्व समिती भोपाळला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी सर्वात आधी शिवराज सिंह यांची भेट घेतली. खट्टर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊनच शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीला आले होते, अशी चर्चा आहे. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे खट्टर यांच्या सातत्याने संपर्कात होते.
पक्षाच्या कार्यालयात आज आमदारांची बैठक सुरु होती. तर कार्यालयाबाहेर प्रल्हाद पटेल आणि शिवराज सिंह चौहान यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि वीडी शर्मा यांच्या नावाची चर्चा होती.