Monkeypox : मंकीपॉ़क्स लहान मुलांसाठी जास्त धोकादायक, ICMRचा इशारा, 20 दिवसांत 21 देशांत 221 जणांना लागण
दुसरीकडे या आजारावरील उपचारासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय प्रायव्हेट हेल्थ ट्रिविट्रॉन हेल्थकेअर या कंपनीने मंकीपॉक्सच्या तपासणीसाठी एक आरटी पीसीआर टेस्ट किट तयार केले आहे. एका तासाच्या आत या टेस्टचा निकाल मिळणार आहे.
नवी दिल्ली – मंकीपॉक्सचे (Monkey pox)संक्रमण जगात वेगाने पसरत असताना, आपल्या देशातही क्रेंदीय पातळीवर (Center government) हे प्रकरण गांभिर्याने हाताळण्यात येते आहे. लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जाहीर केले आहे. या आजाराबाबतच्या लक्षणांवर पालकांनी लक्ष ठेवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. सध्या देशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी सरकार याबाबत गांभिर्याने पावले उचलत आहे. दुसरीकडे या आजारावरील उपचारासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय प्रायव्हेट हेल्थ ट्रिविट्रॉन हेल्थकेअर या कंपनीने मंकीपॉक्सच्या तपासणीसाठी एक आरटी पीसीआर टेस्ट किट तयार केले आहे. एका तासाच्या आत या टेस्टचा निकाल मिळणार आहे.
२१ देशांत २२६ प्रकरणे
अर्जेंटिनात मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण समोर आला होता. हा रुग्ण नुकताच स्पेनवरुन परतला होता. त्यापूर्वी प. अफ्रिकेतून दुबईत आलेल्या एका महिलेलाही नंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले होते. आत्तापर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, २१ देशांत मंकीपॉक्सचे २२६ रुग्ण सापडले आहेत. ज्या देशांत मंकीपॉक्स आजारच अस्तित्वात नव्हता, अशा देशांमध्येही या आजाराचे १०० हून अधिक संशयित रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
अफ्रिकेबाहेर आजार गेला कसा, याचा शोध सुरु
सध्या यातली दिलाशाची बाब म्हणजे, मंदीपॉक्सच्या व्हायरसमध्ये जेनेटिक बदल झालेला नाही. याचाच अर्थ असा की आत्तापर्यंत या व्हायरसचे मानवी शरीरात म्युटेशन झालेले नाही. हा आजार अफ्रिकेबाहेर कसा पसरला, याचा शोध आता घेण्यात येतो आहे.
स्पेनमध्ये सर्वाधिक रुग्ण
या महिन्यात मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण स्पेनमध्ये सापडले आहेत. शुक्रवारपर्यंत इथे ९८ रुग्ण सापडले आहेत. तर इंग्लंडमध्ये १०६, पोर्तुगालमध्ये ७४ रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. यासह मंकिपॉक्सचे रुग्ण हे कॅनडा, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली आणि अमेरिकेतही सापडले आहेत.
समलैंगिक पुरुषांना जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
समलैंगिक पुरुषांतही या संक्रमणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आहे. स्पेन आणि बेल्जियममध्ये झालेल्या दोन पार्ट्यांमुळे हे संक्रमण वाढले असल्याची शक्यता आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे. ज्या रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आहेत, त्या रुग्णांच्या स्पर्श करु नका, जवळ जाऊ नका, लैंगिक संबंध ठेवू नका, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. रुग्णाच्या जवळ जायचे असल्यास मास्क घाला आणि हात धुवा असेही सांगण्यात आले आहे.
प्राण्यांमध्येही पसरण्याची भीती
इंग्लंडमध्ये संक्रमित रुग्णांना पाळीव प्राण्यांपासू किमान तीन आठवडे लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या रुग्णांच्या घरात पाळीव प्राणी आहेत, त्यांनी २१ दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवावे असेही सांगण्यात आले आहे. हा आजार प्राण्यांमध्येही पसरण्याची भीती आहे.