Ayodhya Ram Mandir | फक्त दरवाज्यांसाठीच 1 क्विंटलहून अधिक सोन्याचा वापर, अयोध्येतल्या भव्य दिव्य राम मंदिराची विशेष माहिती
अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची तारीख जवळ येतेय. अनेक वर्षींची प्रतीक्षा संपून 22 जानेवारीला रामाची मूर्ती भव्य-दिव्य मंदिरात विराजमान होणाराय. या मंदिरामागे किती मराठी हात लागले, त्यांची भूमिका किती महत्वाची होती, आणि कसं आहे अयोध्येतलं राम मंदिर याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, अयोध्या | 27 डिसेंबर 2023 : अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर हे नागर शैलीत बांधलं गेलंय. 24 तास अहोरात्र काम, देशभरातले कुशल कारागिरी आणि त्या-त्या भागातल्या वैशिष्ठ्यपूर्ण साधनांनी रामाचं मंदिर उभं राहिलंय. पूर्ण बांधून झाल्यावर भव्यदिव्य राम मंदिर कंसं दिसणार? याबद्दल देशभरातील राम भक्तांना उत्सुकता आहे. राम मंदिराचा परिसर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल. मंदिराचा हा संपूर्ण परिसर 67 एकराचा आहे. आणि प्रत्यक्ष मंदिर हे 2 एकर जमिनीवर उभं राहिलंय. गर्भगृहासह पूर्ण मंदिर एकूण 3 माळ्यांचं असेल. यात प्रत्येक माळ्याची उंची 20 फूट इतकी आहे. या मुख्य शिखराच्या खालीच मंदिराचं गर्भगृह असणार आहे.
पहिल्या टप्यात बालरुपातल्या रामाची मूर्ती असेल, आणि दुसऱ्या टप्प्यात राम दरबार असणार आहे. मुख्य शिखराबरोबरच इतर 5 छोटे शिखर किंवा घुमट असतील. इथल्या मंडपांना नृत्य, रंग, सभा, प्रार्थना आणि कीर्तन अशी पाच नावं दिली गेली आहेत. मंदिराचा प्रवेश पूर्व दिशेनं, तर दर्शनानंतर दक्षिण दिशेनं बाहेर पडण्याचा मार्ग करण्यात आलाय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकूण 32 पायऱ्या आहेत. पायऱ्या पार केल्यानंतर जरी तुम्ही पहिल्या टप्प्यातल्या मंडपाखाली आलात, तरी इथून तुम्हाला गर्भगृहातल्या रामाचं दर्शन होऊ शकतं. पूर्ण मंदिरात एकूण 380 खांब आहेत.
48 दिवस मंडल पूजा
16 जानेवारीपासून मंदिराची नित्यनेमानं पूजा सुरु होणार आहे. 20 जानेवारीला अक्षता सोहळा पार पडेल, आणि 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीला दुपारी 12 वाजून 29 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आलाय. यानंतरची पुढचे 48 दिवस मंडल पूजा होईल. मंदिर परिसरात पुढच्या 7 ते 8 महिन्यात वेगवेगळी सात मंदिरं अजून तयार होतील. ज्यात महर्षि वाल्मिकि, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी, अहिल्या आणि जटायूचंही मंदिर असणार आहेत.
फक्त दरवाज्यांसाठीच एक क्विंटलहून अधिक सोन्याचा वापर
पूर्ण मंदिरासाठी एकूम 44 द्वार असतील. प्रत्येक दरवाज्यात बनवलेल्या साच्यांमध्ये जवळपास 3 किलो सोन्याचा वापर झालाय. सर्व दरवाजे एकत्रित केल्यास फक्त दरवाज्यांसाठीच एक क्विंटलहून अधिक सोन्याचा वापर केला गेलाय. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातल्या सागवानापासून बनवली गेली आहेत. हैद्राबादच्या कारागीरांनी त्यांना तयार केलंय. दरवाज्यांवर हत्ती आणि कमळाच्या आकृतीसह आकर्षक कोरिवकामही केलं गेलंय.
मंदिर परिसरात एकाच वेळी 25 हजार भाविकांची व्यवस्था करता येईल, या पद्धतीनं नियोजन करण्यात येतंय. भक्तांसाठी सुविधा केंद्र, आरोग्य सुविधांसंह इतर सोयी असतील. 25 हजार लोक आपले मोबाईल, चप्पल किंवा बूट एका ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतील, अशी व्यवस्थाही उभी करण्यात आलीय. स्थानिकांच्या माहितीनुसार मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे तयार व्हायला अजून 2 वर्ष लागू शकतात. याच वेगानं काम जरी सुरु असलं तरी पूर्ण सुविधा आणि छोटी-मोठी कामं पूर्ण व्हायला 2026 उजाडू शकतं. या घडीला मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झालाय, ज्यात गर्भगृह आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराची बाजू बांधून पूर्ण झालीय.