आयपीएस एन. अंबिका. तामिळनाडू. संघ लोकसेवा आयोगापर्यंत एन. अंबिका यांची वाटचाल प्रेरणादाई आहे. प्रयत्न केल्यास काही अशक्य नाही, हे दाखवणारी त्यांची यशोगाथा आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. वयाच्या 18 वर्षी त्यांना दोन मुले झालीत. घरात सर्व सुखसोयी होत्या. त्यांच्या संसारात एन. अंबिका रमल्या होत्या. परंतु असे काही झाले की त्यांनी आयपीएस बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. पतीला हा निर्णय सांगितल्यावर त्यांनी सुरुवातीला हसण्यावरती नेले. परंतु अंबिका आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
एन. अंबिका यांचे पती तामिळनाडू पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. प्रजाकसत्ताक दिनाच्या परेडमध्ये आयपीएस अधिकाऱ्यास त्यांच्या पतीने सॅल्यूट ठोकले. ते अंबिका यांनी पाहिले. त्यावेळी आयपीएस अधिकाऱ्यास एक वेगळाच सन्मान असल्याचे त्यांनी पाहिले. ही गोष्टी त्यांच्या मनात खोल रुजली. मग आपणही आयपीएस अधिकारी बनावे, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयास घरी कोणी गंभीरतेने घेतले नाही. कारण त्यांचे शिक्षण फक्त दहावी झाले होते. परंतु एन. अंबिका यांनी करुन दाखवले. त्या आयपीएस झाल्या.
अंबिका आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. यामुळे त्यांचा परिवार त्यांचा निर्णयाचा सोबत आला. मग दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केले. बारावी केल्यानंतर पदवी मिळवली. पदवी घेतानाच यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यासाठी पती अन् मुलांसोबत त्या चेन्नईमध्ये शिफ्ट झाल्या होत्या. त्यांचे पती आपले ड्यूटी सांभाळून मुलांची देखभाल करत होते.
अंबिका यांनी परीक्षेची तयारी केली अन यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नातही अपयश मिळाले. त्यानंतर त्यांच्या पतीचा विश्वास तुटला. त्यांनी पुन्हा घरी जाण्याचा विचार सुरु केला. परंतु अंबिका पराभव पत्कारला तयार नव्हत्या. पुन्हा एकदा त्यांनी परीक्षेची तयारी सुरु केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 2008 मध्ये अंबिका आयपीएस झाल्या. प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले.