संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या भेटीला, रायगडावरील कामांना गती देण्याची मागणी
रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्त्व विभागाला 2018 साली 11 कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. त्यापैकी पुरातत्त्व विभागाने गेल्या साडे तीन वर्षांत केवळ 60 लाख रूपयांचीच कामे केलेली आहेत. तर उर्वरीत निधी तसाच पडून आहे.
नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नवनिर्वाचित केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगडावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री महोदयांना दिली. रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्त्व विभागाला 2018 साली 11 कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. त्यापैकी पुरातत्त्व विभागाने गेल्या साडे तीन वर्षांत केवळ 60 लाख रूपयांचीच कामे केलेली आहेत. तर उर्वरीत निधी तसाच पडून आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्खनन व जतन संवर्धनाची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत. केवळ सहाच ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे. इतर वाड्यांच्या उत्खननाची कामे हाती घेतलेली नाहीत. तरी, या कामांना गती देऊन निश्चित वेळेत ती पूर्ण करावीत, याबाबत संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. (MP SambhajiRaje Chhatrapati Met Union Minister G. Kishan Reddy)
रायगडावरील हत्ती तलाव आणि इतर पाणवठे, महादरवाजा तटबंदी, नाणे दरवाजा यांचं जतन आणि संवर्धनाची कामे मागील चार वर्षांत प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. तसेच फरसबंद, पायरीमार्ग, स्वच्छतागृहे, भूमिगत विद्युत वाहिन्या अशी विकासात्मक कामेदेखील प्राधिकरणामार्फत सुरू आहेत, याबाबत मंत्री रेड्डी यांना संभाजीराजे यांनी सविस्तर माहिती दिली.
इतर किल्ल्यांवर देखील ‘रायगड मॉडेल’ राबवण्याची मागणी
2018 साली पंतप्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये रायगडावरील मुख्य वास्तूंच्या जतन संवर्धनाची जबाबदारी देखील पुरातत्त्व विभागाने रायगड विकास प्राधिकरणाकडे द्यावी, असं ठरलं होतं. मात्र, अजूनही पुरातत्त्व विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे संभाजीराजे यांनी निदर्शनास आणून दिलं. तसंच या बैठकीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर देखील ‘रायगड मॉडेल’च्या धर्तीवर जतन संवर्धन करण्यात यावे, असंही सुचविण्यात आलं होतं, हि बाबही संभाजीराजे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
केंद्रीय मंत्र्यांना रायगडला भेट देण्याचं निमंत्रण
त्याचबरोबर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते स्वराज्याची राजधानी रायगडपर्यंत असलेल्या खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या जलदुर्गांना सागरी मार्गाने जोडून गेटवे ऑफ इंडीयापासून ते दुर्गराज रायगड पर्यंत ‘सी फोर्ट सर्कीट टूरिझम’ प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा झाली. या सर्व बाबींवर त्वरीत एक उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. तसंच, रायगड विकास प्राधिकरणाचा कार्य अहवाल मंत्री रेड्डी यांना भेट देऊन, लवकरच दुर्गराज रायगडला भेट देण्याचं निमंत्रणही दिलं.
नूतन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. pic.twitter.com/RVJUGTdALl
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 30, 2021
इतर बातम्या :
‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’, आमदार रोहित पवारांचं नितेश राणे आणि सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर
MP SambhajiRaje Chhatrapati Met Union Minister G. Kishan Reddy