Sanjay Raut | राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या वाटेवर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत आहेत. भाजपासोबत बोलणी करण्यासाठी राज दिल्लीला गेले आहेत. मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का? बदलत्यात मनसेला काय मिळणार? याची राजकीय जाणकारांना उत्सुक्ता आहे. मनसे महायुतीसोबत गेल्यास उद्धव ठाकरे गटाला फटका बसू शकतो. कारण मराठी मतदार हा दोघांचा जनाधार आहे. राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : “आधी शिवसेना फोडली तरी काही फायदा झाला नाही. उद्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायम राहील. आणखी काही शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पाडून पदरात पाडून घेता येईल का? याची कारस्थान दिल्लीत सुरु आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील, ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसंदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहना मदत करु इच्छित असतील, तर अशा सर्व नेत्यांची, पक्षांची भूमिका महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहीली जाईल” असं संजय राऊत म्हणाले.
“त्यांचं महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे, ते अशा प्रकारचा काही निर्णय घेणार नाहीत. आम्ही कोणत्याही विषम परिस्थितीचा सामना करुन मोदी-शाह यांच्या महाराष्ट्राद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. “दिल्लीत जाण हा राज ठाकरेंचा अधिकार आहे. त्यांना रात्री भेट मिळाली नाही. त्यावर मत व्यक्त कराव अस नाहीय” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्राच्यात राजकारणात अजून बरच काही घडायच आहे. उद्धव ठाकरे, शिवसेना महाविकास आघाडीला यश मिळतय, म्हणून भितीपोटी हे सर्व घडतय” असा संजय राऊत यांचा दावा आहे.
‘अनेक शाह्यांचा समाचार घेतलाय’
“राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अनेक शाह्यांचा जनतेने समाचार घेतलाय. महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अशा शक्तींना कोणी मदत करत असेल, तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.