मुंबई-दिल्लीहून आली विमानं, अर्धा तास हवेतच घिरट्या, औरंगाबादला उतरलीच नाही, पुन्हा माघारी…
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुकं दिसून आलं. त्यामुळे विमानाच्या प्रवासालाही अडथळे येत आहेत. औरंगाबाद विमानतळालाही याचा फटका बसला.
दत्ता कनवटे, औरंगाबादः मुंबई आणि दिल्लीहून (Delhi) आलेली दोन्ही विमानं (Flight) आज औरंगाबादेत (Aurangabad) उतरलीच नाहीत. मुंबईहून आज सकाळी औरंगाबादेत विमान आलं. अर्धा तास आकाशातच घिरट्या घातल्या आणि परत माघारी फिरले. वातावरणात दाट धुकं असल्याने औरंगाबाद विमानतळाला मोठा फटका बसला आहे. आज मुंबई आणि दिल्लीहून आलेल्या दोन्ही विमानाची लँडिंग रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
उत्तर भारतातील थंडीची लाट आणि थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येतोय. आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुकं दिसून आलं. त्यामुळे विमानाच्या प्रवासालाही अडथळे येत आहेत. औरंगाबाद विमानतळालाही याचा फटका बसला.
मुंबई आणि दिल्लीहून आलेली दोन विमानं औरंगाबादेत लँड होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मुंबई -दिल्ली गाठावी लागू शकते. तर हैदराबादमधून आलेलं एक विमान तब्बल एक तास आकाशात घिरट्या घालून अखेर औरंगाबादच्या धावपट्टीवरून उतरवण्यात आलं.
मध्य प्रदेशात मोठी विमान दुर्घटना, 1 मृत्यू
शुक्रवारी सकाळी दाट धुक्यांमुळे विमान प्रवासाला मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. तर गुरुवारी रात्रीच मध्य प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास रीवा जिल्ह्यातील चोरहटा येथील एका मंदिराला प्रशिक्षणार्थींचे विमान धडकले. मंदिराच्या घुमटाशीच विमानाची जोरदार धडक बसली.
चोरहटा येथून उड्डाण घेतल्यामुळे खराब हवामानामुळे विमान फार उंचीवर उडू शकलं नाही. त्यामुळे आधी ते एका आंब्याच्या झाडाला धडकलं आणि नंतर मंदिराच्या घुमटाला धडकून क्रॅश झालं.
या घटनेत एका सीनियर पायलटचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. दोघांना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशिक्षणार्थी पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे.