कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे मुंबईतील 50 वर्षांपूर्वीच्या घटनेच्या आठवणी ताज्या, काय होती अरुणा शानबाग केस?

Kolkata Doctor Murder Case and aruna shanbaug case: अरुणा शानबाग यांना डॉ.उदय गाडगीळ यांच्याकडे आणले तेव्हा परिस्थिती कशी होती, त्यासंदर्भात पिंकी विराणी यांच्या 'अरुणाची गोष्ट' या पुस्तकात लिहिले आहे की, डॉक्टरांनी हळूच त्या मुलीस पालथे केले. तेव्हा त्या अरुणा शानबाग असल्याचे समजले. त्यांचे केस रक्ताने माखलेले होते. तोंडातून आणि नाकातून वाहिले रक्त चेहऱ्यावर पसरले होते. त्यांचा खालचा ओळ किळस वाटावी इतका सुचला होता.

कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे मुंबईतील 50 वर्षांपूर्वीच्या घटनेच्या आठवणी ताज्या, काय होती अरुणा शानबाग केस?
Kolkata Doctor Murder Case and aruna shanbaug case
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 11:39 AM

गेल्या काही दिवसांपासून देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधील कोलकाताकडे आहे. कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली. या प्रकाराने देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देशभरात डॉक्टर अन् परिचारिकांचा संप सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली आहे. केंद्रीय अन्वेषन विभागाकडून (सीबीआय) या घटनेचा तपास सुरु झाला आहे. या घटनेतील आरोपी कोणी बाहेरचा व्यक्ती नाही तर रुग्णालयातील सिविक वॉलंटियर (पोलिसांना मदत करण्यासाठी असणारा) आहे. संजय रॉय असे त्या आरोपीचे नाव आहे. 2019 पासून तो रुग्णालयात कार्यरत आहे. त्यानेच प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून हत्या केली. पीडितेचा मृतदेह मिळाला तेव्हा तिच्या डोळे आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. चेहऱ्यावर, नखांवर, पोटावर, डाव्या पायावर, मानेवर, उजव्या हातावर, ओठांवर जखमेच्या खुणा होत्या. याच पद्धतीची घटना मुंबईत 50 वर्षांपूर्वी घडली होती.

काय घडले होते मुंबईत

27 नोव्हेंबर 1973 म्हणजेच जवळपास 50 वर्षांपूर्वीचा दिवस मुंबईतील इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता. त्यावेळी देशाला हदरवून सोडणारी घटना मुंबईत घडली. परळमधील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटलमध्ये परिचारिका असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावर रुग्णालयातील वॉर्ड बॉय सोहनलाल भरथा वाल्मीकी यानेच अत्याचार केला. त्यानंतर त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कोलकात्यातील अत्याचाराच्या घटनेमुळे 50 वर्षांपूर्वीच्या त्या अमानुष घटनेच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत. सोहनलाल बाल्मीकीने अरुणावर पाशवी पद्धतीने अत्याचार करुन मरण्यासाठी सोडले होते. त्या भीषण प्रकरणाचा संपूर्ण देशाला धक्का बसला. परंतु गेल्या 50 वर्षांत असे प्रकार आपण रोखू शकलो नाही, हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल. अरुणा शानबाग प्रकरणानंतर सन 2012 मध्ये नवी दिल्लीत निर्भयावर सामूहीक अत्याचार झाले. त्या प्रकरणात आरोपीस तब्बल 8 वर्षांनी शिक्षा मिळाली.

मुंबई परळ येथील केईएम रुग्णालय

काय होती अरुणा शानबाग

महिलांनी चार भिंतीच्या आत राहावे किंवा लग्न करून घर सांभाळावे, या विचाराच्या अरुणा नव्हत्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या पायावर महिलांनी उभे राहायला हवे त्यांचे मत होते. त्यामुळेच कर्नाटकातील शिमोगा येथील हल्दीपूर येथे राहणाऱ्या अरुणा शानबाग मुंबईत आल्या. 1966 मध्ये त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कारकीर्द सुरु केली. घरच्या मंडळींचा विरोध पत्करुन लग्न करण्याऐवजी करियर करण्यासाठी त्यांनी मायानगरी मुंबईत पाऊल ठेवले. नोकरी मिळाली, स्वतःची कमाई सुरू झाली म्हणून त्या शांत बसणाऱ्या नव्हत्या. त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची महत्वकांक्षा होती. त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. मुंबईत त्यांचे आयुष्य आनंदात चालले होते. त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टर संदीप सरदेसाई यांच्यासोबत त्या लग्न करणार होत्या. पण अचानक आयुष्याला पूर्णपणे कालाटणी देणारी एक घटना घडली.

हे सुद्धा वाचा

27 नोव्हेंबर 1973 रोजी काय घडले

केईएम हॉस्पिटलमध्ये उत्तर प्रदेशातील बुलंद शहराजवळ असलेल्या होशियरपूरमधून मुंबईत आलेला सोहनलाल बाल्मीकी हा सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. सोहनलाल वाल्मिकी कुत्र्यांसाठी आणलेल्या खाद्याची चोरी करत असल्याचे अरुणा शानबाग यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे त्यांनी सोहनलालला धारेवर धरले होते. 27 नोव्हेंबर 1973 या दिवशी केईएम हॉस्पिटलच्या तळघरात अरुणा शानबाग ड्युटी रूममध्ये गेल्या होत्या. येथेच सोहनलाल भरता वाल्मिकी याने त्यांना घेरले. त्यांच्यावर अमानूष बलात्कार केला. त्या राक्षसाची क्रूरता इथेच संपली नाही. त्याने कुत्र्याच्या साखळीने अरुणा यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना वेदनादायी मरण्यासाठी तेथेच सोडून पळ काढला. 15 पेक्षा जास्त तास अरुणा त्याच ठिकाणी बेशुद्ध पडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबर 1973 रोजी रुग्णालयातील कर्मचारी इंदर याला त्या तळघरात खाली पडलेल्या सापडल्या. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्याने धावत जाऊन सिस्टर सुलोचना बिची हिला ही घटना सांगितली. सिस्टर बिची तळघरात धावल्या. त्यांना स्टेचरवरुन रुग्णालयातील डॉ.उदय गाडगीळ यांच्याकडे नेले.

अरुणा कोमातच राहिल्या

अरुणा शानबाग यांना डॉ.उदय गाडगीळ यांच्याकडे आणले तेव्हा परिस्थिती कशी होती, त्यासंदर्भात पिंकी विराणी यांच्या ‘अरुणाची गोष्ट’ या पुस्तकात लिहिले आहे की, डॉक्टरांनी हळूच त्या मुलीस पालथे केले. तेव्हा त्या अरुणा शानबाग असल्याचे समजले. त्यांचे केस रक्ताने माखलेले होते. तोंडातून आणि नाकातून वाहिले रक्त चेहऱ्यावर पसरले होते. त्यांचा खालचा ओळ किळस वाटावी इतका सुचला होता. सिस्टर कुशे अरुणाशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. काय झाले असे विचारत होत्या? त्यावेळी त्या सर्व शक्ती एकटवून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु तोंडातून फक्त हुंकारच बाहेर निघाला. अरुणा मृत्यूच्या काठावर होत्या. डॉक्टर जोमाने त्यांच्यावर उपचार करत होते. डॉक्टर आणि नर्सस मिळून अरुणा यांचे शरीराला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करत होते. त्यावेळेपासून अरुणा कोमात गेल्या अन् अखेरपर्यंत तशीच राहिल्या. तब्बल 42 वर्षे अरुणा नावालाच जिवंत होत्या.

वॉर्ड नंबर चारमधील बेडच झाला कायमचा पत्ता

घटनेनंतर केईएम रुग्णालयातील वॉर्ड नंबर चारमधील बेड हाच अरुणा शानबाग यांचा कायमचा पत्ता बनला. त्या जवळपास 42 वर्षे अचेतन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडून होत्या. अरुणा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी नाते तोडले होते. घटना घडण्यापूर्वी रुग्णालयातील डॉक्टर संदीप सरदेसाई बरोबर अरुणा यांचे प्रेम जुळलेले होते. ते लग्नच्या बेडीतही अडकणार होते. परंतु अरुणा बरी होणार नाही, हे समजल्यावर डॉक्टरांनी दुसरे लग्न केले. मग त्यांची काळजी घेणाऱ्या नर्स त्यांचे कुटुंब बनल्या. त्यांचे अरुणाशी भावनिक नाते निर्माण झाले होते. अरुणाच्या सहकारी परिचारिकांनी त्यांची मृत्यूपर्यंत अत्यंत प्रेमाने त्यांची काळजी घेतली. त्यांची सुश्रृषा करणाऱ्या अनेक परिचारिका त्या बलात्काराच्या प्रकरणानंतर अनेक वर्षांनी रूग्णालयात रुजू झाल्या होत्या. परंतु त्या सर्वांनी एखाद्या बहिणीसारखी त्यांची सेवा केली. त्या घटनेनंतर केईएम रुग्णालयातील अनेक परिचारिकांनी भीतीपोटी तळघरात जाणेही टाळले होते. आपल्यासोबतही असेच होईल अशी भीती त्यांना वाटत होती. यानंतर, रुग्णालय प्रशासनाने चेंजिंग आणि ड्युटी रूम अधिक चांगल्या सुरक्षा उपायांसह वरच्या मजल्यावर हलवले.

अरुणा शानबाग प्रकरणातील आरोपी सोहनलाल

आरोपी पकडला गेला पण…

अरुणा शानबाग हल्ला झाला ते वर्ष 1973 होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. या प्रकरणात आरोपी सोहनलाल पकडला गेला होता. परंतु त्याला 1974 मध्ये फक्त मारहाण आणि लूट या आरोपांखालीच दोषी धरण्यात आले. कारण त्यांने अरुणा यांच्या शरीरावरील दागिने काढले होते. त्याच्यावरील अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे त्याला फक्त सात वर्षे शिक्षा झाली. तो 1980 मध्ये कारागृहातून बाहेर आला. त्याच्यावर अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला असता तर त्याला आजीवन कारावास झाला असता. पिंकी विराणी यांच्या ‘बिटर चॉकलेट’ या पुस्तकानुसार अरुणा शानबागची केसही कमी-अधिक प्रमाणात कोलकाता हॉरर केससारखीच असल्याचे दिसते. अरुणा यांनी सफाई कर्मचाऱ्याचा प्रेमाचा प्रस्ताव फेटाळला होता. अरुणाच्या सोबत असणाऱ्या परिचारिकांनी सांगितले की, सोहनलाल वाल्मिकी याने अनेकदा अरुणा शानबाग यांना प्रपोज केले, पण त्यांनी नकार दिला. यामुळेच त्याने अत्याचार केला.

अरुणा यांच्या इच्छा मृत्यूसाठी कायदेशीर लढा

अरुणा शानबाग कोमात गेल्या होत्या. त्यानंतर कधीच बोलू शकली नाही. अरुणा यांचे शरीर फक्त होते. त्यामुळे पिंकी विराणी यांनी अरुणा इच्छा मृत्यू मिळावा, यासाठी 18 डिसेंबर 2009 सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका विचारार्थ स्वीकारली. 24 जानेवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबान यांची तपासणी करण्यासाठी मुंबईतील तीन नामवंत डॉक्टरांची टीम नियुक्त केली. त्यात जे.व्ही. दिवातीया, रूप गुरुशानी आणि नीलेश शहा यांचा समावेश होता. या टीमला अरुणा यांच्या शारिरीक आणि मानसिक स्थितीचा अहवाल देण्यास न्यायालयाने सांगितले. 17 फेब्रुवारी 2011 रोजी डॉक्टरांच्या टीमने कोर्टात अहवाल सादर केला. न्यायालयाने तिघं डॉक्टरांना 2 मार्च 2011 रोजी बोलवले. त्या अहवालात वापरलेल्या तांत्रिक बाबींवर स्पष्टीकरण घेतले. तसेच इच्छा मरणावर मत मांडण्यास सांगितले. त्यावेळी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. शेवटी 7 मार्च 2011 रोजी अरुणा शानबागच्या इच्छा मृत्यूच्या याचिकेवर निर्णय आला. कोर्टाने पिंकी विराणी यांची ही याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, पिंकी विराणी यांचे या प्रकरणाशी काही घेणे देणे नाही. कारण केईएम हॉस्पिटल त्यांची देखभाल करत आहेत. अरुणा यांचे आई-वडील नाही आणि नातेवाईकांनी त्यांच्याशी नाते तोडले आहे. अरुणा यांची सेवा केईएम हॉस्पिटल करत आहे. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारही केईएम हॉस्पिटलला आहे. अखेर 18 मे 2015 रोजी अरुणा शानबाग यांचा मृत्यू झाला आणि मरणयातनातून त्यांची सुटका झाली.

काय आहे इच्छा मृत्यू प्रकार

जेव्हा एखाद्या रुग्णाला खूप वेदना होत असतात किंवा तो आजारातून बरा होऊ शकत नाही, तो दररोज मृत्यूसदृश परिस्थितीतून जातो, अशा परिस्थितीत काही देशांमध्ये इच्छामरण दिले जाते. बेल्जियम, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि लक्झेंबर्गमध्ये इच्छामरणाला परवानगी आहे. अमेरिकेतील फक्त 5 राज्यांमध्ये त्याची परवानगी आहे. अमेरिकेत 1994 मध्ये ओरेगॉन या राज्याने “डेथ विथ डिग्निटी”चे विधेयक संमत झाले. त्या विधेयकात म्हटले आहे की, रुग्णाने आपल्याला मृत्यू येईल, असे औषध दिले जावे, अशी विनंती लेखी किंवा तोंडी करायला हवी. त्यासाठी दोन साक्षीदार समोर हवे. त्यातील एक साक्षीदार रुग्णाचा नातेवाईक असता कामा नये. दोघांपैकी कोणीही त्या रुग्णाच्या संपत्तीचा वारसदार असता कामा नये. रुग्णावर ज्या ठिकाणी उपचार सुरु आहे, त्या जागेशी त्या साक्षीदाराचा संबंध असता कामा नये. लेखी विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला मृत्यूसाठी 48 तास वाट पाहावी लागेल.

भारतात इच्छा मृत्यूला परवानगी नाही

भारतात अजूनही इच्छा मृत्यूला परवानगी नाही. भारतात अरुणा शानबाग पूर्वी इच्छा मृत्यूची मागणी करणारे प्रकार समोर आले होते. 1994 मध्ये पी. रथिनम खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूचा अधिकार मान्य केला होता. परंतु 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय फिरवला. इच्छा मृत्यूचा अधिकार देणे हा घटनेतील कलम 21 च्या जीवनाच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यानंतर 2000 मध्येही केरळ उच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूला परवानगी देणे म्हणजे आत्महत्याला स्वीकार करण्यासारखा प्रकार असल्याचे म्हटले.

50 वर्षांत खरोखर काही बदलले का?

केईएम हॉस्पिटलच्या एका नर्सने सांगितले की, आरजी कार हॉस्पिटल प्रकरणाने पुन्हा एकदा नर्स आणि महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केईएममधील नर्सस म्हणतात, आम्हाला जेव्हा कोलकातामधील आरजी रुग्णालयातील प्रकार समजला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. अरुणा शानबाग प्रकरणानंतर 50 वर्षांत खरोखर काही बदलले आहे का? महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अजूनही प्रश्न आहेत? अरुणा शानबाग असो की नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण असो…हे सर्व प्रकार थांबणार कधी? देशातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला कामावर किंवा आपल्या शहरात सुरक्षित आहेत का? या प्र्श्नांची उत्तरे केवळ कायदा करुन सुटणारी नाही. कारण निर्भया प्रकरणानंतर देशात कठोर कायदेही झाले, परंतु अत्याचाराची प्रकरणे काही थांबली नाहीत. एका बाजूला कायद्याची दहशत हवी तर दुसऱ्या बाजूला समाजाची मानसिकता बदलायला हवी.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.