लांब दाढी, काळा चष्मा, मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर; होणार कसून चौकशी?
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात मोठा हात असल्याचा आरोप आसलेला तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर आला आहे.

Tahawwur Rana : मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात सहभाग असलेल्या तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होते. आता राणाला भारातात आणल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. पांढऱ्या रंगाची दाढी आणि काळ्या रंगाच्या चष्म्यात तो एनआयए अधिकाऱ्यांच्या कडेकोड बंदोबस्तात दिसला आहे.
राणाला विधी सहायता विभागाकडून वकील मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाला विधी सहायता विभागाकडून वकील देण्यात येणार आहे. दिल्ली लीगल सेलचे पीयूष सचदेवा राणाची बाजू मांडणार आहेत. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक आरोपीला न्यायालयात बाजू मांडण्याचा मूलभूत अधिकार आहे. जेव्हा आरोपीकडे वकील नसेल तेव्हा विधी सहायता विभागाकडून वकील दिला जाण्याची तरतूद आहे. त्यामुळेच आता विधी सहायता विभागाकडून राणाला वकील दिला जाणार आहे.
राणाला भारतात कसं आणलं?
तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात एका विशेष मीड साईझ बिझनेस जेटमधून विमानातून आणण्यात आलं. या विमानाला भारतानने व्हिएन्ना येथील एअरक्राफ्ट चार्टर सर्व्हिसकडून भाड्याने घेण्यात आले होते. या जेटने बुधवारी अमेरिकेतून उड्डाण घेतले होते. त्यानंतर हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता पोहोचले. त्यानंतर साधारण 11 तासांनी हे विमान गुरुवारी सकाळी 6.15 वाजता दिल्लीच्या विमानताळाकडे झेपावले. त्यानंतर साधारण संध्याकाळी 6.22 वाजता हे विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरले.
राणाला भारतात आणताना कमालीची गुप्तता
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले आहे. ही मोहीम भारतासाठी सुरक्षेच्या दृटीने फार महत्त्वाची होती. राणाला भारतात आणताना कमालाची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळेच त्याला एका खासगी विमानाने भारतात आणण्यात आले. दरम्यान, आता राणा एनआयएच्या ताब्यात असूनत त्याची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत नेमक्या काय बाबी समोर येणार? याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाला आता तिहारच्या तुरुंगात ठेवले जाणार आहे. या तुरुंगात त्याच्या राहण्याची पूर्ण सोय करण्यात आली आहे. याच तुरुंगाच्या परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.