नितिश-नायडू नवीन सावरकर, काय केला पण, वक्फ कायद्यावर मुस्लिम संघटना आक्रमक, मदनी म्हणाले हस्तक्षेप सहन करणार नाही
Nitish Kumar-Chandrababu Naidu : वक्फ सुधारणा कायद्याविरोधात आणि वक्फ कायदा वाचवा यासाठी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर मोठे संमेलन आयोजित केले आहे. मुस्लिम संघटनांनी यावेळी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे.

वक्फ वाचवाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
वक्फ कायदा आणि त्यातील दुरुस्तीविरोधात आज मंगळवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे मुस्लिम संघटनांनी एल्गार पुकारला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) वक्फ वाचवाची हाक दिली आहे. त्यासाठी मोठे संमेलन आयोजित केले आहे. संघटनेचे महासचिव मौलाना फजलूर रहमान मुजद्दी यांनी म्हणणे मांडले. आम्ही देशाला स्वंतत्र केले. देशासाठी रक्त सांडले. या देशाचे संरक्षण केले. त्याच धरतीवर आज आम्हाला त्रास देण्यात येत आहे, अशी तक्रार त्यांनी केली.
सर्वच हिसकावण्यात येत आहे
मुजद्दी म्हणाले की, आमच्याकडून मशिदी, दफनभूमी, दर्गा हिसकावण्यात येत आहे. हा काळा कायदा आहे. देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हिसकावणारा हा कायदा आहे. वक्फ कायदा मागे घ्या यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वक्फ वाचवा आंदोलनात खालिद सैफुल्लाह रहमानी, अध्यक्ष, AIMPLB, असदुद्दीन ओवैसी, जमात ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सदतुल्लाह हुसैनी, मलिक मोहताशिम खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष, जमात ए इस्लामी हिंद, अजमेर दर्गाचे के सज्जादानशीन सरवर चिश्ती, शिया धर्मगुरु कल्ब ए जवाद हे सहभागी झाले होते.
शरीयतमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही
मौलाना अरशद मदनी यांनी यावेळी कायद्यावर ताशेरे ओढले. वक्फचे रक्षण करणे ही आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे ते म्हणाले. वक्फ सुधारणा कायद्या हा आपल्या धर्मात थेट हस्तक्षेप आहे. वक्फ वाचवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. मुस्लिम प्रत्येक गोष्ट सहन करेल. पण शरियतमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
वक्फ कायदा 2025 आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जर देशाची घटना वाचवायची असेल तर वक्फ सुधारीत कायदा हा पूर्णपणे हटवायला हवा. घटना ही लोकशाहीचा पाया आहे. या घटनेवरच लोकशाहीची ही मजबूत आणि सुंदर इमारत उभी असल्याचे मदनी म्हणाले. त्यामुळे घटना वाचली तरच देश वाचेल असे ते म्हणाले. हा मुद्दा आम्ही हिंदू-मुस्लीम करण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. ही लढाई हिंदू-मुस्लिम अशी नाही. काही जण हा मुद्दा तसा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे नवीन सावरकर
एसडीपीआयचे मोहम्मद शफी यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे नवीन सावरकर असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य रफीउद्दीन अशरफीन यांनी तर सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले आमचा निर्धार पक्का झाला आहे. वक्फ कायदा परत घ्या, आम्ही आमचे प्राण पण द्यायला तयार आहोत. आता मुस्लिम समाजाला रस्त्यावर उतरून त्यांची बाजू मांडावी लागेल असे ते म्हणाले.