नवी दिल्ली, दि. 8 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार? याची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला 370 तर एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा आपल्या भाषणात केला. त्यानंतर आता टाइम्स नाऊ नवभारतचा सर्वे आला आहे. महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील हे समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष होणार आहे. परंतु एनडीएला 400 च्या लक्ष्यापेक्षा थोड्या कमी जागा मिळणार आहे, असे सर्वेक्षणात दिसत आहे. या सर्वेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षणात इंडिया आघाडीला 104 जागा आणि इतरांना 73 जागा मिळणार आहे. तसेच एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून तीन महिने बाकी आहेत. यामुळे एनडीएचे 400 चे लक्ष्य गाठता येईल, असा अंदाज ताज्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी 400 च्या जवळ जाताना दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या मतांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी पुन्हा एकदा बहुमतापासून दूर दिसत आहे. ओडिशा आणि तेलंगणामध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही नितीशकुमार यांच्या आगमनाचा फायदा भाजपला होत आहे. भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये कुठेतरी आघाडी दिसत आहे.
सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचे भाकीत केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 39 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि शरद गटाला 9 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीत जाण्याचा फायदा होणार की तोटा तर 22 टक्के लोकांनी तोटा होणार असल्याचे म्हटले आहे. 32 टक्के लोकांनी फायदा होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या.