नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत NDAची बैठक बोलावली होती. दिल्लीतील अशोका हॉटेल येथे ही बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर एक मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे केंद्राच्या योजना लागू करण्यात दिरंगाई केली जाते. गरिबांना त्या योजना पुरवण्यात टाळाटाळ केली जाते. आपण स्वत: या योजनांसाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या योजनेपासून गरिबांना लांब ठेवणारे नेमके मुख्यमंत्री कोण आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पंतप्रधान मोदींनी कोणत्याही मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्या भाषणात स्पष्टपणे घेतलेलं नाही.
“देशाची जनता एनडीएला सकारात्मक दृष्टीकोनाने पाहत आहे. आमचा संकल्प ध्येय, भावना आणि रस्ता सकारात्मक आहे. सरकार बहुमताने बनतं, पण देश सर्वांच्या प्रयत्नांनी चालतो. आम्ही विकसित भारताच्या निर्मितीसाठी जोडलो गेलो आहोत. एनडीए सर्वाच्या प्रयत्न सुरु असल्याच्या भावनांचं प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या देशात राजकीय आघाड्यांची एक मोठी परंपरा आहे. पण जी आघाडी नकारात्मक विचारांनी बनले ते कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
“काँग्रेसने 1990 च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी गठबंधनाचा (आघाडीचा) वापर केला. काँग्रेसने सरकार बनवली, सरकार बिघडवलं, याच दरम्यान 1998 मध्ये एनडीएची स्थापना झाली होती. त्यावेळी सत्ता स्थापन करणं हेच एनडीएचं ध्येय नव्हतं. एनडीए कुणाच्या विरोधात किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी बनलं नव्हतं. देशात स्थिरता आणण्यासाठी एनडीएची स्थापना झाली होती. देशात जेव्हा स्थिर सरकार असतं तेव्हा देश मोठे निर्णय घेतो जे खूप महत्त्वाची ठरतात”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“भारतात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याने आज संपूर्ण जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. एनडीएची आणखी एक विशेषत: आहे. आम्ही विरोधात असतानाही सकारात्मक राजनीती केली. आम्ही लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही विरोधात राहून सरकारला विरोध केला, त्यांचे घोटाळे समोर आणले. पण जनादेशाचा कधीच अपमान केला नाही. आम्ही विदेशातून मदत माहितली नाही”, असा टोला मोदींनी लगावला.
“आम्ही विरोधात असताना कधी रोडवर बंदी आणली नाही. केंद्र सरकारच्या योजना अनेक राज्यांमधील सरकार हे आपल्या इथे लागू होऊ देत नाहीत. या योजना लागू झाल्या तरी तितक्या वेगाने काम केलं जात नाही. हे विचार करतात की, त्यांच्या राज्यात गरिबांना केंद्र सरकारची योजना मिळायला लागली तर कसं काम चालेल? राजकारण कसं चालेल?”, असा आरोप मोदींनी केला.
“गरिबांच्या घरासाठी, हर घर जलसाठी, आयुष्यमान भारत योजनेसाठी कित्येक वेळा विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना मला पत्र लिहावं लागतं. हे लोक गरिबांच्या कल्याणाला देखील राजकीय नफा-तोट्याच्या हिशोबाने मोजत असतात”, असा देखील आरोप मोदींनी केला. “जेव्हा आघाडी सत्तेच्या मजबुरीसाठी असेल, आघाडी भ्रष्टाचाराची नीती, घराणेशाही, जातीवाद, प्रांतवादला लक्षात ठेवून निर्माण होत असेल तर त्याने देशाचं खूप मोठं नुकसान होतं”, असं मोदी म्हणाले.
“2014 च्या आधीच्या आघाडी सरकारचं उदाहरण आमच्यासमोर आहे. अनेक घडामोडींदरम्यान त्या आघाडी सरकारने आपले 10 वर्ष पूर्ण केलं होतं. पण देशाला काय मिळालं? पॉलिसी पॅरालिसीस, निर्णय घेण्यात अक्षमता, अव्यवस्था आणि अविश्वास, भ्रष्टाचार, लाखो कोटींचे घोटाळे. क्रेडीट घेण्यासाठी सर्वजण पुढे येत होते. पण जेव्हा काही चूकीचं ठरत होतं तेव्हा इतर मित्रपक्षांकडे बोट दाखवलं जात होतं”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
“आम्ही भाग्यशाली आहोत की, NDA ची स्थिती यापेक्षा एकदम उलट आहे. NDA मजबुरी नाही तर मजबुतीचं माध्यम आहे. क्रेडीट सर्वांचं आणि दायित्वही सर्वांचं आहे. कोणताही पक्ष मोठा किंवा छोटा नाही. आम्ही सर्व एका लक्ष्यासाठी पुढे जात आहोत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण एनडीए मजबूत राहीलं”, असा दावा मोदींनी केला.