देशातली सर्वांत मोठी घडामोड! राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात EDकडून आरोपपत्र दाखल!
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे.

ED files chargesheet against Rahul Gandhi and Sonia Gandhi : नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार
या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन दुबे तसेच अन्य लोकांचीही नावे आहेत. असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्ष कायदेशीर सल्ला घेत आहे. वकिलांकडून योग्य तो सल्ला घेऊन राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्ष आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे.
एकूण 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
या प्रकरणात ईडीने आतापर्यंत असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड तसेच यंग इंडियाची साधारण 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलेली आहे. कोट्यवधींची ही संपत्ती ही वाममार्गाने जमवलेली आहे, असा आरोप आहे. याच आरोपाअंतर्गत ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत दिल्ली, मुंबई आणि लखनौ येते ही जप्तीची कारवाई केलेली आहे. यातील एकूण 661.69 कोटी रुपयांची संपत्ती ही असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि 90.21 कोटी रुपयांची संपत्ती ही यंग इंडियाशी संबंधित आहे.
सोनिया आणि राहुल गांधींची झालेली आहे चौकशी
ईडीने 2014 साली दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशानंतर असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाविरोधात पिएमएलए कायद्याअंतर्गत तपास चालू केला होता. याच प्रकरणात याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झालेली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडीस, मोतीलाल वोहरा, सुमन दुपे आरोपी आहेत.
कथित घोटाळा कसा झाला?
असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएल कंपनीला अगोदर वर्तमानपत्र प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी देशभरात या कंपनीला सवलतीच्या दरात जमिनी देण्यात आल्या होत्या. 2008 साली मात्र एजेएल कंपनीने प्रकाशन बंद केले. त्यानंतर या कंपनीच्या संपत्तीचा व्यावसायिक उद्देश समोर ठेवून उपयोग केला जाऊ लागला, असा आरोप आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाने एजेएलची संपत्ती यंग इंडियाच्या नावे ट्रान्सफर करून घेतली, असा दावा केला जातो. त्यानंतर यंग इंडियाचे शेअर्स हे गांधी कुटुंब तसेच अन्य जवळच्या लोकांना सोपवण्यात आले. ज्यामुळे या सर्व संपत्तीवर गांधी कुटुंबाचे नियंत्रण आले, असा आरोप केला जातो.
दरम्यान, आता राहुल गांधी, सोनिया गाांधी तसेच इतरांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.