नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, महाराष्ट्रातील (maharashtra) राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट अत्यंत मानली जात आहे. मात्र, या धाडसत्रावर दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाली की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत आहेत. आज त्यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज भाजपचाही स्थापना दिवस आहे. त्यामुळे मोदी सकाळी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. त्यानंतर दुपारी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड 20-25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार काल दिल्लीत आले होते. अभ्यास वर्गासाठी हे आमदार दिल्लीत आले होते. महाराष्ट्रातील या आमदार, खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पवारांनी या सर्व आमदारांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे नेते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी संजय राऊत यांनी आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राऊत यांच्याकडे माईक येताच भाजपच्या आमदारांनी काढता पाय घेतला होता. काल महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांशी संवाद साधल्यानंतर आज पवारांनी मोदींची भेट घेतल्याने या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महागाईविरोधात आंदोलन