Ncp mlas disqualification case | राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Ncp mlas disqualification case | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल देण्यासाठी एक मुदत घालून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली (संदीप राजगोळकर) : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालायने मुदत दिली आहे. राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणं हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी असं मनु सिंघवी म्हणाले. सर्वोच्च न्यायालायने नार्वेकरांना तीन नाही, दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली. “आज तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल. पण निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ द्या. पण कोर्टाने मात्र त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल” अशी हमी तुषार मेहता यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निवडणूक आयोगाचा निकाल कधी येणार?
“वेळ जरी थोडा वाटत असला, तरी निवडणूक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे. तो आला तर त्या आधारावर नार्वेकर निकाल देऊ शकतात, जसं की त्यांनी शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? चिन्ह कोणाला मिळणार? या बाबत निवडणूक आयोगाचा निकाल आज किंवा या आठवड्यात कधीही येऊ शकतो” असं वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालायने कधी पर्यंतची मुदत दिली?
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी दोन गट पडले. शरद पवार गट आणि अजित पवार गट. शरद पवार एक विरोधी पक्षात आहे, तर अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे.