इंडिया आघाडीला काऊंटर करण्यासाठी एनडीएचा तगडा प्लान, ऐनवेळी ठेवणीतलं हत्यार काढणार; काय आहे मेगा प्लान?
लोकसभा निवडणुकांना वेळ असला तरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकींची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नवी दिल्ली; | 31 ऑगस्ट 2023 : एनडीएला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तसेच आज इंडिया आघाडीची तिसरी मिटिंग मुंबईत पार पडत आहे. दोन दिवस ही मिटिंग चालणार आहे. या मिटिंगसाठी दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. देशात इंडिया आघाडी मजबूत होतानना दिसत आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला इंडिया आघाडीचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएनेही भाजपला रोखण्यासाठी तगडा प्लान तयार केला आहे. या बैठकीच्या निमित्ताने भाजप आपलं ठेवणीतलं अस्त्र काढणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपआपले जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपनेही विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. बूथ बांधणीपासून ते सोशलम मीडिया मजबूत करण्यावर भाजपने भर दिला आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भाजपने भर देण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियाचा हत्यारासारखा वापर केला जाणार आहे.
तरुण मतदारांवर फोकस
भाजपने तरुण मतदारांना फोकस करण्यास सुरुवात केली आहे. तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर अधिक जोर देण्यावर भाजपने भर दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्यावरही भाजपने भर देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मिशन शंखनाद
भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप लवकरच संपर्क अभियान सुरू करणार आहे. मिशन शंखनाद नावाने भाजपने हे मिशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मिशनच्या माध्यमातून भाजप 10 कोटी लोकांच्या संपर्कात जाणार आहे. तीन टप्प्यात या मिशनवर काम करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
10 कोटी मतदरांशी संपर्क साधणार
भाजप या मिशनच्या माध्यामातून 25 लाख सोशल मीडिया व्हॉलिंटर्सच्या माध्यामातून 10 कोटी मतदारांशी संपर्क साधणार आहे. हे स्वयंसेवकर व्हॉट्सअपसहीत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधतील. 2019च्या लोकसभा निवडमुकीत भाजपला जवळपास 23 कोटी मते मिळाले होते. त्यावेळी भाजपने व्हॉट्सअपच्या माध्यममातून 10 कोटी मतदारांना संपर्क साधण्याचं टार्गेट ठेवलं होतं. आता पुन्हा भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मतदारांशी संपर्क साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबतची ट्रेनिंगही स्वयंसेवकांना दिली जाणार आहे.