Yasin Malik | दहशतवादी यासीन मलिक अतिरेक्यांच्या फंडिंग प्रकरणी दोषी, 25 मे रोजी सुनावणी, कोर्टाचे आदेश काय?
कोर्टाने यासीन मलिकला सर्व आरोपांमध्ये दोषी मानले असून त्याला कोणती शिक्षा होईल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यासीन मलिकने यापूर्वीच सर्व आरोप स्वीकार केले होते. त्यामुळे या प्रकरणी त्याला जास्तीत जास्त आजीवन कारवासाची शिक्षा होऊ शकते.
नवी दिल्लीः दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील विशेष NIA कोर्टाने काश्मीरमधील दहशतवादी (Terrorist) यासीन मलिक (Yasin Malik) प्रकरणी महत्त्वाची सुनावणी केली आहे. कोर्टानं यासीन मलिकवर लावण्यात आलेल्या UAPA सहित सर्व आरोपांमध्ये तो दोषी असल्याचे म्हटले आहे. तसेच यासीन मलिकच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यासाठी त्याच्या संपूर्ण संपत्तीचं विश्लेषण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. NIA कोर्टाने यासीन मलिकलाही स्वतःच्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पटियाला हाऊसमधील विशेष कोर्टात (Special court) 25 मे रोजी पुढील सुनावणी होईल. त्यामुळे पुढील आठवड्यात यासीन मलिकला किती शिक्षा होईल, यावर युक्तीवाद केला जाईल. त्यानंतर यासीन मलिकच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
यासीनवरचे आरोप काय?
फुटिरतावादी अतिरेकी यासीन मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरोधात युद्ध छेडणे, अवैध कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे कोर्टासमोर यासीन मलिकने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. मलिकने कोर्टाला सांगितले की, तो कलम 16 (दहशतवादी कारवाया), 17 (दहशतवादी कारवायांसाठी पैसा जमा करणे ), 18 (दहशतवादी कारवायांचा कट रचणे) आणि 20 (दहशतवादी समूह किंवा संघटनेचा सदस्य असणे) तसेच भादंवि 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124- A (देशद्रोह) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही.
आणखी आरोपी कोण?
या प्रकरणी यासीन मलिकसह शब्बीर शाह, मसर्रत आलम, माजी आमदार राशिद इंजिनिअर, जहूर अहमद शाह वटाली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहमद शाह, नईम खान, बशीर अहमद भट, उर्फ पीर सैफुल्ला सह इतरही काश्मीरी फुटिरतावाद्यांचा समावेश आहे. पटियाला हाऊस येथील NIAच्या विशेष कोर्टाचे जज प्रवीण सिंग यांनी 16 मार्च रोजीच्या आदेशात म्हटले होते की, हे सर्वच आरोपी समान उद्देशासाठी परस्परांशी जोडलेले होते. तसेच पाकिस्तानच्या दिशानिर्देशांनुसार, ते आर्थिक मदतीसाठी दहशतवादी संघटनांशी जोडलेले होते. सर्व साक्षी पुरावे आणि दस्तावेजांच्या विश्लेषणानंतर कोर्टानं हे मत मांडलं होतं.
काय शिक्षा होऊ शकते?
जम्मू काश्मीरमध्ये स्वतंत्र्य युद्धाच्या नावावर फुटिरतावादी कारवाया आणि इतर दहशतवादी कारवाया पूर्णत्वास नेण्यासाठी यासीन मलिक आणि इतर दहशतवाद्यांना प्रत्यक्ष पैसा मिळत होता. हा पैसा मिळवण्यासाठी त्यांनी जगभरात एक व्यापक नेटवर्क उभे केले होते, असेही निरीक्षण कोर्टाने मांडले. कोर्टाने यासीन मलिकला सर्व आरोपांमध्ये दोषी मानले असून त्याला कोणती शिक्षा होईल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यासीन मलिकने यापूर्वीच सर्व आरोप स्वीकार केले होते. त्यामुळे या प्रकरणी त्याला जास्तीत जास्त आजीवन कारवासाची शिक्षा होऊ शकते.