New Rules from 1 March : उद्यापासून बदलणार हे नियम, तुमच्यावर थेट करणार परिणाम
फेब्रुवारी महिन्यात सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. जे आता मार्च महिन्यात लागू होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. कसे जाणून घ्या.
मुंबई : आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. पण हा दिवस संपताच उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून काही नियमांमध्ये बदल होत आहे. हे नियम तुमच्यावर थेट परिणाम करणारे आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होत असतात. सरकारने फेब्रुवारीमध्ये अनेक नियम बदलले आहेत. जे आता मार्च महिन्यापासून लागू होणार आहेत. यामध्ये घरगुती सिलिंडर, बँकेचे कर्ज, ट्रेनच्या वेळा अशा अनेक नियमांचा समावेश आहे. LPG सिलिंडरची किंमत (LPG Price) ते बँक लॉकर नियमांचा यामध्ये समावेश आहे. मार्चमध्ये होणार्या काही महत्त्वाच्या बदलांबद्दल जाणून घेऊयात. ( New Rules from 1 march 2023 )
12 दिवस बँका बंद राहणार ( BANK HOLIDAYS )
मार्च महिन्यात होळी, नवरात्री असे अनेक सण येत असल्याने आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार मार्चमध्ये 31 पैकी 12 दिवस बँका बंद राहतील.
गाड्यांचे वेळापत्रक बदलणार ( RAILWAY TIMETABLE )
उन्हाळा अगदी जवळ आला आहे. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे रेल्वे अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलू शकते. अशा परिस्थितीत मार्चमध्ये नवीन वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
कर्ज महागणार ( BANK LOAN )
रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी MCLR दर वाढवले आहेत. ज्याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. कर्जावरील व्याजदर वाढू शकतात. त्याचबरोबर अनेक बँकांनी निश्चित केलेले नवे दर 1 मार्चपासून लागू होणार आहेत.
सोशल मीडिया नियम ( SOCIAL MEDIA RULES )
केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तीन तक्रार अपील समित्या स्थापन करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसाठी हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाशी संबंधित तक्रारी 30 दिवसांत सोडवल्या जातील.
एलपीजी-सीएनजी-पीएनजीच्या किमती निश्चित ( LPG-CNG-PNG PRICE )
एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. गेल्या वेळी 1 फेब्रुवारी रोजी कंपन्यांनी घरगुती सिलिंडरसाठी पैसे वाढवले नव्हते. यावेळी सणासुदीमुळे गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर 1 मार्चपासून गॅस सिलिंडर बुकींगच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो.