मुझे बचा लीजिए, मै जीना चाहती हूँ… तरुणीचा सोनू सूद याला मेसेज, नवऱ्याला राखी बांधली; काय आहे प्रकरण ?
लग्न झालेलं असतानाही एका तरुणीचं तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सदर तरुणीने अभिनेता सोनू सूद, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
जोधपूर : सर, मै तरुणा शर्मा. मला वाचवा. मला शिकायचं आहे. पण घरच्यांनी माझं 40 वर्षाच्या पागल मुलासोबत जबरदस्ती लग्न लावून दिलंय. माझा शारीरिक, मानसिक छळ होत आहे. मला जिवंत जाळण्याचा प्रयत्नही होत आहे. सर, मला जगायचंय…एका तरुणीने हा मेसेज थेट अभिनेता सोनू सूद याला पाठवला आहे. सोनू सूदला टॅग करून तिने आपली व्यथा मांडतानाच मदतीची अपेक्षा केली आहे. या तरुणीने फक्त सोनूलाच नाही तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही टॅग केलं आहे.
छत्तीसगडच्या कांकेर आणि राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याशी संबंधित हे प्रकरण आहे. तक्रार करणाऱ्या तरुणीचं नाव तरुणा शर्मा असं आहे. ती जोधपूरच्या बालेसर येथील राहणारी आहे. तर तिचं सासर कांकेरच्या अंतागड येथील आहे.
काय आहे प्रकरण ?
तरुणा शर्माने तिच्या बालपणाचा मित्र सुरेंद्र सांखला याच्याशी 13 जानेवारी 2023 कोर्ट मॅरेज केलं होतं. घरच्यांना न सांगता तिने हे लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्या घरातील मंडळी तिच्यावर नाराज होते. त्यामुळे घरच्यांनी तिच्यावर दबाव टाकून तिला घरी बोलावलं. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून तिचं लग्न ठरवलं. छत्तीसगडच्या अंतागडमधील जितेंद्र जोशी या तरुणासोबत तिचं लग्न लावून दिलं. 1 एप्रिल 2023 रोजी हा विवाह पार पडला. तरुणीने आपलं लग्न जबरदस्ती लावून दिल्याचा आरोप केला आहे. तसेच तिचा नवऱ्याकडून छळ होत असल्याचा आरोपही तिने केला आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यात तिचा जीव वाचला.
रग्णालयात उपचार घेत असतानाच तिने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून राष्ट्रपती, पंतप्रधान, राजस्थानचे मुख्यमंत्री आणि सोनू सूद यांना ट्विटरवर टॅग करून मदतीची याचना केली आहे. या तरुणीचा हा मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे छत्तीसडसहीत कांकेर जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर अंतागड पोलीस ठाण्याचे प्रभारी रोशन कौशिक नवविवाहितेच्या घरी गेले. त्यानंतर पोलिसांनी या नवविवाहितेला सखी वन सेंटरच्या हवाली केले. सखी वन सेंटर हा राज्यातील महिला आणि बालकाच्या विकासासाठी काम करतो.
पहिला नवरा काय म्हणाला ?
तरुणाचा पहिला नवरा सुरेंद्र सांखला यानेही या प्रकारावर भाष्य केलं आहे. मी आणि तरुणा जोधपूरच्या बालेसरमध्ये एकत्र शिकलोय. जोधपूरमध्येच आम्ही कॉलेजात शिक्षण घेतलं. त्यानंतर मी बीए करून मेडिकल लाईनमध्ये काम करू लागलो. तरुणा बीएड झाल्यानंतर सरकारी शाळेत शिक्षिका बनण्यासाठी प्रयत्न करत होती. 2017पासून आम्ही दोघं रिलेशनशीपमध्ये आलो. त्यानंतर आम्ही 13 जानेवारी 2023 रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आर्य समाज मंदिरात लग्नही केलं. मी माळी समाजातील आहे. तर पत्नी ब्राह्मण आहे. त्यामुळे तिच्या घरच्यांना हे लग्न मंजूर नव्हतं. जेव्हा त्यांना आमच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा आम्ही दोघे पळून गेलो. जोधपूरला राहू लागलो. त्यानंतर आम्ही जोधपूर एसपीच्या कार्यालयात आमची तक्रार द्यायला गेलो. पण एसपीने पोलीस ठाण्यातच तक्रार नोंदवली जाणार असल्याचं सांगितलं, असं सुरेंद्रने म्हटलंय.
जीवे मारण्याची धमकी
काही वेळाने आमच्या गावात पोलीस आले. आमच्या दोघांची साक्ष नोंदवून आम्हाला गाडीत बसवून घेऊन गेले. तिथे आमची साक्ष घेण्याऐवजी अनेक तास आम्हाला टॉर्चर केलं गेलं. दोघांच्याही घरच्यांना बोलावण्यात आलं. आपआपल्या घरी जाण्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला. तरुणाच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत होऊन आम्ही आमच्या नातेवाईकांसोबत घरी आलो, असंही त्याने म्हटलं आहे.
गुजरातला लपवलं
त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी तिला गुजरातच्या अहमदाबाद आणि सुरतमध्ये लपवून ठेवलं. तिचा मोबाईल काढून घेतला. तिला कुणालाही भेटू दिलं जात नव्हतं. त्यानंतर छत्तीसडमधील तरुणाशी तिचा विवाह लावून दिला. लग्नानंतर तिला घरातच कोंडून ठेवलं गेलं. तिच्यावर नजर ठेवण्यात आली. तिचा छळ केला गेला, असंही त्याने म्हटलं आहे. एक दिवशी तरुणाने मला एका नंबरवरून कॉल केला. तिने सर्व प्रकार सांगितला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यापासून सोनू सूदपर्यंत अनेकांकडे ट्विटरवरून मदतीची मागणी केल्याचं तिनं सांगितलं.
पतीला राखी बांधली
दरम्यान, तरुणाने तिचा दुसरा पती जितेंद्र जोशी याला राखी बांधली आहे. तसा दावा तिने केला असून एक व्हिडीओही तिने जारी केला आहे. या व्हिडीओत ती जितेंद्रला राखी बांधताना दिसत आहे. ती जितेंद्रला पती मानायलाच तयार नाहीये.