निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव, त्यामुळेच निकालाला वेळ; संजय राऊत यांचा आरोप
जे आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईत करतो, तेच जम्मूत करणार आहोत. येथील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.
जम्मू: निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच निकाल द्यायला वेळलागत आहे, असा आरोप करतानाच शिवसेनेचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. अध्यक्ष ठरवणं न ठरवणं हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत हे जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच जम्मूत शिवसेना निवडणूक लढणार असल्याचंही जाहीर केलं.
पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग आला आहे. पण आमचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. बाळासाहेब ठाकरे हे अजीवन अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाने नियम केल्यानंतर आम्ही नंतर निवडणूक घ्यायचो. उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच राहतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
सरकार येतात आणि जातात
यावेळी त्यांनी जम्मूतील समस्यांवरही भाष्य केलं. आम्ही आश्वासन देत नाही. आमचा आश्वासनावर विश्वास नाही. आमचा वचननामा असतो. आम्ही प्रश्नावर बोलत असतो. सरकार येतात आणि जातात. आजही बेरोजगारी आहे. आम्ही प्रश्नांची यादी तयार केली आहे. स्थानिकांना रोजगार देण्यावर आमचा भर राहील, असं त्यांनी सांगितलं.
राजकारण बंद झालं पाहिजे
जे आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईत करतो, तेच जम्मूत करणार आहोत. येथील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आमच्या पक्षाची स्थापना भूमिपूत्राच्या मुद्द्यावरच झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि इतर ठिकाणी जाऊन पाहा. रोजगाराची समस्या तशीच आहे.
370 कलम हटवल्यावर रोजगार येतील असं सरकारने सांगितलं होतं. पण रोजगार आले नाही. हे केवळ राजकारण आहे. राजकारण बंद झालं पाहिजे. महापालिका असो की लोकसभेची निवडणूक जम्मूतील प्रश्न तसेच आहेत, असं ते म्हणाले.
तर युतीही करू
जम्मूत निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आमच्या कार्यकारिणीशी चर्चा सुरू आहे. जम्मूत इतर पक्षांशी आघाडी होत असेल आणि आम्हाला सन्मानजनक स्थान मिळत असेल तर आम्ही युती करू. नाही तर स्वबळावर लढू. आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत. जम्मू बाबत आमची आस्था राहिली आहे, असंही ते म्हणाले.
सर्व हवेत आहे
ब्लास्ट झाले आहेत. ब्लास्ट होणार आहे. कुठे आहे सुरक्षा? मी आधीही सवाल केला होता. सर्व काही ठिकठाक होईल हे वचन या राज्याला मिळालं होतं. ते सर्व हवेत आहे, असं टोला त्यांनी लगावला.