एकांतात पॉर्न पाहणं अश्लीलता किंवा गुन्हा आहे काय?; उच्च न्यायालयाने दिलं थेट उत्तर
अश्लील व्हिडीओ पाहणं गुन्हा आहे काय? मोबाईलवरून हे व्हिडीओ पाहिल्यास काय होऊ शकते? एकांतात अश्लील व्हिडीओ पाहणं आणि सार्वजनिक ठिकाणी हे व्हिडीओ पाहणं यापैकी गुन्हा कोणता? की दोन्ही गोष्टी गुन्ह्यात येतात... याचं उत्तर उच्च न्यायालयाने दिलं आहे.
तिरुवनंतपूरम | 13 सप्टेंबर 2023 : एकांतात पॉर्न व्हिडीओ पाहणं अश्लीलता किंवा गुन्हा आहे काय? या प्रकरणात शिक्षा होऊ शकते काय? पॉर्न व्हिडीओ पाहावेत की पाहू नये? असे असंख्य प्रश्न अनेकांना पडत असतात. या प्रश्नांवर केरळच्या उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचं उत्तर दिलं आहे. एका व्यक्तीच्या विरोधात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. या व्यक्तीवर पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होता. त्यावर पॉर्न व्हिडीओ पाहणं अश्लीलतेत येतं की नाही यावर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
रस्त्यावर उभं राहून पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता कोर्टाने महत्त्वाची निरीक्षणं नोंदवत निकाल दिला आहे. जर एखादी व्यक्ती व्यक्तीगतरित्या चोरून अश्लील व्हिडीओ पाहत असेल, तो व्हिडीओ कुणालाही पाठवत नसेल, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडीओ पाहत नसेल तर अशा गोष्टी अश्लीलतेच्या गुन्ह्यात येत नाही. मोबाईलवर अशा प्रकारे अशा प्रकारे कंटेट पाहणं कुणाची खासगी आवड असू शकते. कोर्ट कुणाच्या एकांतपणावर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
बंधन घालू शकत नाही
लाइव्ह लॉच्या माहितीनुसार, कोर्टाने या प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहे. अश्लील व्हिडीओ दुसऱ्यांना दाखवल्याशिवाय वैयक्तिक पाहणं भादंविच्या कलम 292 च्या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांच्या श्रेणीत येत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानुसार जर एखादा व्यक्ती जर मोकळ्या वेळात कुणालाही न दाखवता पॉर्न व्हिडीओ पाहत असेल तर तो गुन्हा ठरतो का? तर त्यावर नाही असं उत्तर आहे. ही प्रत्येकाची वैयक्तीक आवड असू शकते. अशावेळी कोर्ट त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं बंधन घालू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
गुन्हा ठरत नाही
कोणत्याही व्यक्तीने एकांतात अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाहणं आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत गुन्हा ठरत नाही. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ पाहत असेल किंवा अश्लील व्हिडीओ प्रसारित आणि वितरीत करत असेल तर तो आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत गुन्हा ठरतो. आपल्या देशात एक पुरुष आणि एक महिला यांच्या दरम्यान सहमतीने एकांतात यौन संबंध ठेवणंही गुन्हा नाहीये, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
मुलांकडे मोबाईल देताना
यावेळी न्यायामूर्ती कुन्हिकृष्णन यांनी सावधानतेचा इशाराही दिला. कोणत्याही देखरेखीशिवाय अल्पवयीन मुलांना मोबाईल देणं अधिक धोकादायक असतं. इंटरनेट अॅक्सेस असलेल्या मोबाईवरून अश्लील व्हिडीओ सहज पाहिले जातात. लहान मुलं हे व्हिडीओ पाहू शकतात. त्याचे दुष्पपरिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुलांकडे मोबाईल देताना काळजी घ्या, असा सावधानतेचा इशाराही कोर्टाने दिला आहे.