वादळ एक नाही अनेक; बिपरजॉय वादळाबरोबरच ‘या’ तीन वादळांचाही धोका वाढला…
या चक्रीवादळामुळेही अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. या वादळामुळे मात्र तैवानमध्ये पाऊस सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : मागील तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे अनेक राज्यांसह जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यातच बिपरजॉय वादळामुळे किनारपट्टीच्या गावांना धोका निर्माण झाल्याने गुजरातमधील 1 हजारपेक्षा जास्त गावांना धोक्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातच आज ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाल्या आहेत. हे वादळ उत्तरेकडे हळूहळू सरकत असून ते आज दुपारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकणार आहे, तर या वादळाचा सर्वाधिक फटका हा गुजरात राज्याला बसणार आहे. त्यामुळे आतापर्यंत 45 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मात्र सध्या एक नाही तर अनेक चक्रीवादळांचा आशियाला धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे बिपरजॉय.
वादळ एक नाही अनेक
अरबी समुद्रात 4 जून रोजी ताशी 30 किलोमीटर वेगाने सुरू झाले आणि आता ते संथ गतीने पुढे जात आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार 15 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता गुजरातच्या कच्छला धडकण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी त्याचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत असणार आहे. त्याच बरोबर 4 जून रोजी दक्षिण चीन समुद्रात दुसरे चक्रीवादळ आले आहे.
तैवानमध्येही वादळाचा फटका
त्याचा वेगही ताशी 30 किलोमीटर होता. यानंतर ते पुढे जात राहिले आणि 6 जून रोजी चीनच्या हैनान प्रांताला धडकले, परंतु त्याचा वेग कमी होता, त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र, हैनानमध्ये जोरदार वाऱ्यासह 5 मिमी पाऊस झाला, जो अजूनही सुरूच आहे. त्यानंतर ते 8 जून रोजी चीनच्या आणखी एका प्रांतात नॅनिंगला धडकले होते. येथून हे चक्रीवादळ 14 जून रोजी ते तैवानच्या दिशेला वळले. या चक्रीवादळामुळेही अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. या वादळामुळे मात्र तैवानमध्ये पाऊस सुरू झाला आहे.
चक्रीवादळाची दिशा बदलली
आशियातील तिसरे चक्रीवादळ 5 जून रोजी फिलिपिन्सच्या समुद्रात सुरू झाले असून त्याचा वेग ताशी 35 किलोमीटर होता. परंतु जसजसा पुढे जात राहिले तसतसा त्याचा ताशी वेग 155 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. तर तज्ज्ञांनी असा अंदाज बांधला जात होता की हे वादळ टोकियो, जपानला धडकेल, परंतु सुदैवाने चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आणि ते फिलीपीन समुद्रात सरकू लागले आणि तिथेच ते संपेल.